Feeds:
Posts
Comments

मुंबई मेरी जान हा निशिकांत कामत चा दुसरा चित्रपट, पहिला होता मराठीतला – ‘डोंबिवली फास्ट’. चित्रपट फारच सुरेख जमलाय…मुख्य म्हणजे आपल्याला काय करायचे आहे, काय दाखवायचे आहे आणि काय करायचे/दाखवायचे नाही आहे हे त्याला पक्के माहित असल्यासारखे वाटते; आणि ते फार मह्त्वाचे आहे. हा सिनेमा बॉम्बस्फोट करणार्‍यांना दाखवत नाही की पकडत नाही. इथले नायक किंवा पोलीस १० अतिरेक्यांना लोळवत नाही किंवा त्यांचा तळ उध्वस्त करत नाही….फार कशाला, पोलीस चित्रपटात हुशारी दाखवून काही विशेष तपासही करत नाही.

सुचना/Disclaimer – Spoilers ahead! आणि हे वस्तुनिष्ठ, तटस्थ वगैरे परिक्षण नाही, सिनेमा खूप आवडला, म्हणून लिहिले! Nothing objective about it!

चित्रपट ११ जुलै २००६ ला मुंबई लोकलमधे झालेल्या ७ बॉम्बस्फोटांच्या संदर्भात वेगवेगळ्या लोकांच्या जीवनात डोकावून बघतो. चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा १००% तुमच्या-आमच्यासारखी माणसे वाटतात आणि तुमच्या-आमच्यासारखीच वागतात. सगळ्याच व्यक्तिरेखा फार सुरेख, तपशीलात लिहिल्यात आणि तितक्याच सशक्तपणे त्या पडद्यावर त्या-त्या कलाकारांनी निभावल्यात – चित्रपटाचे कास्टिंग हे चित्रपटाचे एक महत्वाचे बलस्थान – सगळेच कलाकार त्या-त्या व्यक्तिरेखाच वाटतात. अगदी माधवन पण फार हिरोगिरी न करता प्रामाणिकपणे भुमिकेत शिरतो आणि त्याहून महत्वाचे म्हणजे (नेहमीप्रमाणे चुकार मुलासारखा बाहेर न पडता) बहुतांश वेळ भुमिकेतच राहतो! Wink

ह्यातील पात्र त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या सामाजिक-आर्थिक दर्जाला साजेशी वागत राहतात, आणि त्यातून निर्माण होते ते नाट्य, आणि या सगळ्याच्या पार्श्वभुमीला हादरवून सोडणार्‍या बॉम्बस्फोटांचा अनुभव! चित्रपट सुरुवातीपासून पकड घेतो, आणि अखेरपर्यंत खिळवून ठेवतो! ह्यात वेगवेगळ्या पात्रांच्या वेगवेगळ्या कथा आहे – -आणि मुंबई ह्या एका धाग्याने त्यांना सहजपणे बांधून ठेवले आहे. लोकलमधील बाँबस्फोट ह्या एकाच अनुभवाचे त्यांच्या भावविश्वात वेगवेगळे पडसाद उमटलेत.

माधवन हा एक उच्च-मध्यमवर्गीय, पर्यावरण, सार्वजनिक वाह्तूकीचे फायदे ह्यांची जाणीव असलेला, एक कॉर्पोरेट नोकरीपेशा माणूस. योगायोगाने त्या दिवशी सेकंड क्लास मधे बसतो आणि म्हणूनच वाचतो…पण ह्या अनुभवाने पुर्णपणे हादरून जातो…त्याची बायको प्रेग्नंट…तो ऑनसाईट बद्दल विचार करु लागतो…गाडीच्या शोरुम मधे जाऊन गाडी विकत घ्यायचा विचार करू लागतो…लोकलविषयी एक अनामिक भीती मनात बसते…

दुसरा असाच साधा, गरीब केरळी चहावाला – इरफान….त्याच्या जीवनात तसा फारसा फरक पडला नाही, पण पुर्वी एकदा मॉल मधे पत्नी व मुलीबरोबर झालेल्या अपमानाचा बदला घ्ययचा म्हणून फोनवरून मॉलमधे बाँब ठेवल्याच्या खोट्याच बातम्या देतो..आणि ते खाली होणारे मॉल, भयभीत उच्चवर्णीय लोग बघून आसूरी आनंद घेत असतो, आणि असाच एक दिवशी त्याला त्याच्या अफवांचे गांभीर्य कळते…. (नाही, नाही – त्याची मुलगी चिरडत वगैरे नाही….असेच बाळबोध cliché निशिकांतने टाळलेत!)…फारशे संवाद नसले तरी इरफानने ही भुमिका फारच छान केली आहे! केरळी टच ही त्याची आयडीआ होती म्हणे!

तिसरी सोहा-अली-खान, ही ‘खोया खोया चांद’ पासून अभिनेत्री म्हणून बरीच प्रगल्भ झाली आहे. तर ही (अशाच) एका न्यूज चॅनलची रिपोर्टर…तोच कुप्रसिद्ध प्रश्न ‘आप को इस वक्त कैसा लग रहा है?’ विचारणारी…तिचा भावी जोडीदार (समीर धर्माधिकारी) ह्या बाँबस्फोटात मरण पावतो आणि तिच्या न्यूज चॅनलवर तिलाच ह्या प्रश्नाला सामोरे जावे लागते…नंतर तिच्यावर ‘रुपाली बनी रुदाली’ अशी स्टोरी बनवली जाते…ही तिच्या आयुष्यातली उलथापालथ!

चौथा बेकार, मित्रांबरोबर टवाळक्या करणारा, मुस्लिमद्वेष्टा सुरेश; के के मेनन – त्याने ह्याही भुमिकेचे सोने केले आहे….त्याला कुठल्याही भुमिकेत टाकले तरी तो १००% निभावतो….तर हा असाच एक चहाच्या दुकानात टाइमपास करणारा मुलगा… बॉम्बस्फोटांनंतर तर अधिकच कट्टर होतो….शेजारच्या टेबलावर बसणारा युसुफ त्या दिवसानंतर दिसत नाही, तर ह्याचा संशय अजूनच बळावतो…तो मग त्याचा माग काढतो, घर शोधतो…तो सगळाच सिक्वेंस छान घेतलाय…त्याचे छोटे, छोटे संवाद ‘ये लोग किशोरकुमार कभी नहीं सुनेंगे’, किंवा पटकन ओंकार असलेले लॉकेट लपवणे, नजरेनेच ‘बघ मी सांगत नव्हतो तुला?’ असे मित्राकडे बघणे…सगळेच दाद देण्यासारखे. के के मेनन ग्रेटच आहे, आणि तितकीच दाद निशिकांत च्या टेकींगला!

आणि शेवटी पाचवा ह्या सगळ्यांना वरताण – हवालदार तुकाराम पाटील; परेश रावल! हा अपेक्षेप्रमाणेच चित्रपटाचा मास्टरस्ट्रोक (याचा अर्थ बाकीचे सूमार आहेत असा अजिबात नाही. खर तर के के मेनन आणि परेश रावल मधे डावे-उजवे करणे अवघड आहे!)…ह्या हवालदाराला रिटायरमेंटला काहिच दिवस राहिलेत…त्यातच ही घटना घडते…तिथे कदम नावचा एक नवीनच हवालदार भरती झाला आहे…ह्या पात्राचेही एक उप-कथानक आहे…त्याची हनीमूनची सुट्टी बॉम्बस्फोटांमुळे कँन्सल होते…त्यामुळे तो चिडलेला….मग त्या अनुषंगाने येणारे पोलिसांचे किस्से, त्यांचा तपास…नागरिकांशी संवाद…त्या हवालदार तुकाराम पाटीलला येणारी क्षुद्रतेची (insignificant असल्याची), वैफल्याची भावना त्यावर त्याचा विनोदाचा उतारा, आणि ह्या सगळ्या पलिकडे दिसणारा त्याचा कनवाळू समजूतदारपणा…ही भुमिका परेश रावलने अफलातून केली आहे. हा माणूस खरच अशक्य आहे….त्याचे पोलीस स्टेशनमधले शेवटचे भाषण, के के मेननला व्हॅन मधे बोलवतो तो प्रसंग…हे सगळेच अफाट….काहिही विशेष प्रयत्न न करता हा माणूस फक्त ‘हवालदार तुकाराम पाटील’ वाटतो! परेशला फक्त जागेवरूनच सलाम! बॉस, तुम सचमुच मे बहुत बडा आदमी है बे!

ह्या सगळ्यात जाणवणारी निशिकांतची दिग्दर्शक म्हणून प्रगल्भ समज आणि ह्या माध्यमाची अनन्यसाधारण जाण- ह्याचा हा फक्त दुसरा चित्रपट आहे हे सांगूनही खरे वाटत नाही! सगळ्यात महत्वाचे त्याने निवडलेली पटकथेची व्याप्ती आणि त्याची ट्रीटमेंट – फिल्मी होण्यासारखे खूप प्रसंग, उपकथानक असूनही त्याने तो मोह टाळला आहे. तसेच आपल्याला ह्या चित्रपटात अशा घटनांचा तुमच्या-माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांवर होणारा परिणाम एवढेच (आणि फक्त तेवढेच) दाखवायचे आहे हे त्याने पक्के ठरवले आहे – आणि म्हणूनच ते तो तो खूप परिणामकाररित्या दाखवू शकला आहे – मला वाटते हे त्याचे यश खूप मोठे आहे. त्याची प्रतिके, त्याचे भाष्य हे खूप सहजपणे चित्रपटाचा भाग म्हणून येते – ते प्रसंग मुद्दाम घुसवल्यासारखे, किंवा बटबटीतपणे ठिगळासारखे येत नाहीत (बटवटीतपणाच्या बटबटीत उदाहरणासाठी आठवा इंद्रकुमार इराणी साहेबांचा ‘बेटा’, कुंभाराचे चाक, ओली माती…नुसता वैताग!!!!)…कित्येकवेळा तो हे खूप प्रभावीपणे संवादाशिवायही जाणवून देतो.

एक प्रसंग — सोहा-अली-खानला तिच्या न्यूज चॅनेलचा बॉस आणि एक सहकारी तिच्यावर स्टोरी करायची आहे हे सांगायला येतात…ते बोलत असतात…कॅमेरा तिचे अतिशय उच्चभ्रू, चकचकीत घर दाखवत असतो….कॅमेरा तिच्या आरशासारख्या लखलखीत, व्हिट्रीफाईड टाईल्सवर ब्लर्‍र्‍ होतो…मग हळूच शार्प फोकस मधे त्या लखलखीत टाईल्सवर तिची विद्ध प्रतिमा दिसते..तिचे डोळे पाणावले आहेत…बॉसचे बोलणे संपते…तो व तिच्या कलीगचे बुटाचे पाय त्या टाईल्सवरुन, तिच्या विद्ध चेहर्‍यावरून टाक-टाक चालत बाहेर जातात….

तर अशा वेगवेगळ्या पात्रांच्या जीवनात बॉम्बस्फोटांमुळे वेगवेगळ्या तर्‍हेने उलथापालथ होते…त्यांचे भावविश्व ढवळून निघते….यथावकाश, आपापल्या परीने, वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या कारणांनी ती पात्रे सावरतात, भानावर येतात…तशीच महानगरी मुंबईही आपल्या रुळांवर चालू लागते….त्यांना आणि त्यांच्यावरोबरच ह्या सगळ्या प्रवासाचे साक्षीदार (खर तर भागीदार म्हणावे इतका चित्रपट सुरेख/वास्तवदर्शी झाला आहे) असलेल्या आपल्यालाही जाणवते….की जीवन अपरिहार्यपणे पुढे जातच राहते! आणि ही जाणीव एक बधीर, भावनाशून्य जाणीव नसते, तर ती असते एक सहृदय, समंजस, ओली जाणीव….

(मास्तरांच्या भाषेत सांगायचे तर) चित्रपटाचे प्रिमाईस एका ओळीचे – Life still goes on… आणि कुठेही शब्दबंबाळ, अतिरेक न करता ‘मुंबई मेरी जान’ हे सहजपणे आपल्याला जाणवून देतो. बॉम्बस्फोटांसारखा हादरवणारा विषय असूनही निघतांना आपण सहजपणे गुणगणतो, ‘ऐ दिल, है मुश्किल जीना यहाँ…!’

Ahmed Faraz - Image courtesy Internetआज सकाळ मधे वाचलेल्या बातमीनुसार जेष्ठ शायर अहमद फराज़ उर्फ ‘सईद अहमद शाह’ ह्यांचे २५ ऑगस्टला निधन झाले (सकाळ ची तारीख चुकली आहे – पाकिस्तानी आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांमधे २५ ऑगस्टला निधन झाले असे म्हटले आहे). त्यांनी पाकिस्तानातील लष्करशाहीला खुलेआम विरोध केला होता. २००४ मधे त्यांना त्यांच्या साहित्यासाठी पाकिस्तानात हिलाल-ए-इम्तियाज हा पुरस्कार मिळाला होता, तो २००६ ला परत करतांना ते म्हणाले होते (विकीपिडीया च्या माहितीवरुन साभार) -

“My conscious will not forgive me if I remained a silent spectator of the sad happenings around us. The least I can do is to let the dictatorship know where it stands in the eyes of the concerned citizens whose fundamental rights have been usurped. I am doing this by returning the Hilal-e-Imtiaz (civil) forthwith and refuse to associate myself in any way with the regime…”

एका पतिभावान कवी शिवाय ते एक अतिशय सुसंस्कृत, विद्वान व्यक्तिमत्व होते. मला अर्वाचीन शायरांमधे त्यांची रोमँटीक शायरी अतिशय आवडते. रोमँटीक शायरीतही त्यांच्या कल्पनांचे नावीन्य, हळूवारपणा, हळवेपणा हा खूप भावतो. जसे -

अब के हम बिछडे तो शायद कभी ख्बाबों मे मिले,
जिस तरह सुखे हुए फूल किताबों मे मिले।

त्यांच्या कित्येक गज़ला ह्या मेहदी हसन, गुलाम अली आणि जगजीत सिंग ह्यांनी गायल्या आहेत. त्यातली मेहदी हसनने गायलेली `रंजीश ही सही…’ ही अतिशय गाजलेली गज़ल. त्याशिवाय ‘अब के हम बिछडे’, ‘दोस्त बन कर भी नहीं साथ निभानेवाला’, ‘कठीन है राहगुजर’, ‘करूँ ना याद मगर किस तरह भुलाऊँ उसे, गज़ल बहाना करूँ और गुनगुनाऊँ उसे’, ‘जो भी दुख याद न था याद आया’, ‘ज़िन्दगी से यही ग़िला है मुझे’, ‘फिर उसी राहगुजर पर…शायद’, ‘शोला था जल-बुझा हूँ’, ‘ये आलम शौक का देखा न जायें’ (त्यातील खास करुन कडवे – “फराज़ अपने सिवा है कौन तेरा, तुझे तुझसे जुदा देखा न जायें|” फारच सुरेख!), ‘ख्वाब मरते नहीं’ अशा कित्येक एकापेक्षा एक सरस गजला/नज्म आठवतात…गज़ल गाणारे गायक खूप प्रसिद्धी मिळवतात, पण त्यामानाने हे सुंदर शब्द लिहिणारे, त्या हळूवार भावना लिहिणारे कवी कित्येकदा अपरिचितच राहतात, त्याबद्द्ल खंत वाटते. ‘रंजीश हि सही ‘ माहित नसलेला गज़ल प्रेमी विरळाच, पण त्याचे शायर ‘अहमद फराज़’ होते हे कितीजणांना माहित असेल? असो!

हीच ती गाजलेली रंजीश हि सही -

रंजीश ही सही दिल हि दुखाने के लिए आ
आ फ़िर से मुझे छोड के जाने के लिये आ

पहले से मरासिम न सही फिर भी कभी तो
रस्म-ओ-रहे दुनिया हि निभाने के लिए आ

किस किस को बतायेंगे जुदाई का सबब हम
तू मुझ से खफ़ा है तो जमाने के लिए आ
कुछ तो मेरी पिंदार-ए-मोहब्बत का भरम रख
तू भी तो कभी मुझ को मनाने के लिए आ

एक उम्र से लज्जत-ए-गिरया से भी महरुम
ऐ राहत-ए-जान मुझ को रुलाने के लिए आ

अब तक दिल-ए-खुश-फ़हम को तुझ से है उम्मीद
ये आखरी शमाँ भी बुझाने के लिए आ

-अहमद फ़राज
(मरासिम = नाती, relations; पिंदार-ए-मोहब्बत= प्रेमाची खोली/अभिमान, depth/pride of love; लज़्ज़त-ए-गिरिया=दु:खाची/अश्रुंची चव, taste of tears/sorrow; महरूम=वंचित, devoid of)

रंजीश हि सही इथे ऐकता आणि बघता येईल -

आणि ही माझी स्वतःची आतिशय आवडती अब के हम बिछडे…

अब के हम बिछडे तो शायद कभी ख्बाबों मे मिले,
जिस तरह सुखे हुए फूल किताबों मे मिले।

ढुंड उजडे हुए लोगों मे वफा के मोती,
ये खजाने तुझे मुमकीन है खराबों मे मिले।

तू खुदा है न मेरा इश्क फरिश्तों जैसा,
दोनो इन्साँ है तो क्यों इतने हिजाबों मे मिले।

गमे-दुनियाँ भी गमे-यार मे शामिल कर लो,
नशा बढता है शराबें जो शराबों मे मिले।

अब न वो मै हूँ, न वो तू है; न वो माज़ी है ‘फराज़’,
जैसे दो शख्स तमन्नाओं के सराबों मे मिले।

- अहमद फराज़

(खराब=खंडहर, हिजाब=गोशा, veil, सराब= भास, illusion )

अब के हम बिछडे इथे ऐकता आणि बघता येईल -

माझी ह्या जेष्ठ कवीला माझी छोटीशी श्रद्धांजली. त्यांची लेखणी आता ‘ख्वाब कभी मरते नहीं…’ अशा आदर्शवादी, आशावादी किंवा ‘अब के हम बिछडे तो शायद कभी ख्बाबों मे मिले, जिस तरह सुखे हुए फूल किताबों मे मिले।’ अशा हळुवार रचना लिहिणार नाही…


अवांतर – मेहदी हसन कित्येक वेळा ‘रंजीश ही सही’ गातांना हे २ अशआर (शेर चे अनेकवचन) त्यात गुंफायचा; काफिया-रदीफ तोच पण हे अशआर ’तालिब बाग़पती’ ह्यांनी लिहिले आहेत, अहमद फराज़ ह्यांच्या मूळ ‘रंजिश ही सही’ ह्या गज़ल मधे ते नाहित.

ते अशआर असे -

माना के मुहब्बत का छुपाना है मुहब्बत
चुपके से किसी रोज़ जताने के लिये आ|

जैसे तुझे आते हैं, न आने के बहाने
ऐसे ही किसी रोज़ न जाने के लिये आ|

काळजीपुर्वक वाचल्यास असे लक्षात येते, खास करून ‘रंजिश ही सही’ ही गज़ल गज़ल-मुसलसिल असल्यामुळे की मूळ गज़लेतील रंग थोडा दु:खी, तीव्र विरहवेदनेचा आहे; तर ह्या दोन तालिबच्या द्विपदींमधे हा रांग थोडा गुलाबी रुसव्या-फुगव्याचा, छेडछाडीचा आहे. भाव, व्याकरण तेच, पण भावना त्याच नाही — आणि अर्थातच शायरही तो नाही.

भडकमकर मास्तरांनी ‘साठेचं काय करायचं?‘ ह्या नाटकाच्या परिक्षणात मांडलेला ‘राजीव नाईक’ ह्यांचा हा विचार मनात रेंगाळत, खर तर वादळासारखा घोंघावत राहिला…

आपली मीडिऒक्रिटी , सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?

खरच, का छळत, होरपळत असावा हा विचार एवढा? विचार करत राहिलो, आणि जे सुचले ते इथे मांडायचा प्रयत्न करतो आहे….

मला वाटते, स्वतःची मीडिओक्रिटी जरी ओळखता आली तरी स्वीकारता, पचवता येत नाही. तो पचवण हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार होतो कारण त्यात मीडिओक्रिटी नाकारण्याची (denial) स्टेज संपतच नाही. तिचा ‘acceptance’ ही सगळ्यात अवघड गोष्ट. मग त्यातूनच अपरिहार्यपणे येणारी कौतुकाची, टाळ्यांची लाचारी आणि त्या(च)साठीचे केविलवाणे प्रयत्न… किंवा त्यातूनच निर्माण होणारे असूया/मत्सर्/द्वेष जे ह्या नाटकात दाखवले आहे. ह्या भावना सर्वसामान्य आणि त्यावरील प्रतिक्रियाही लेखकाने म्ह्टल्याप्रमाणे रिपीटिटीव्ह…त्याच, त्याच आवर्तात, भोवर्‍यात पुन्हा, पुन्हा अडकल्यासारख्या….अगदी अनुभवलेली, वास्तववादी script!

जरा दूर जाऊन, दूरस्थ (त्रयस्थ नाही, पण भावनावेगापासून दूर ह्या अर्थाने – दूरस्थ) राहून विचार करत होतो तेंव्हा वाटले, खरच मीडिओक्रिटी हे एक perception (नेमकं काय म्हणू याला?) शिवाय दुसरं काय आहे? म्हणजे तसे बघितले तर “बेस्ट” हे कोणाच्या तुलनेत? आपल्या वर्तुळातील सहकारी, मित्र-मैत्रिणींच्या की आपल्या गावात, राज्यात, देशात, परदेशात्/विश्वात??? कुठल्या तुलनेत म्हणायचे हे “बेटर” आणि “बेस्ट” आणि मग ही स्पर्धा कोणाशी, कोणा-कोणाशी किंवा कोणा-कोणाच्यात? आणि वेळेचे अजून एक डायमेंशन धरायचे की नाही? म्हणजे सचिन तेंडुलकर हा “बेस्ट” बॅटसमन – हा समकालीन खेळाडुंमधे की त्याची तुलना मग डॉन ब्रॅडमन शी किंवा अजूनही कोणाशी? बर मग सचिन जर “बेस्ट” तर मग बाकिच्यांनी बॅटिंग करुच नये का? अगदी ज्ञानेश्वरीतच (दस्तुरखुद्द ज्ञानेश्वरांनी) म्हटले आहे – सगळ्यात सुंदर चाल राजहंसाची असली तरी इतरांनी चालुच नये का? सुप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट डॉ. अल्बर्ट एलिस हेच REBT मधे सांगतो!

विचार केला की पटते की आपल्यालाही…अरे असेल लता मंगेशकरचा आवाज स्वर्गीय; पण म्हणून कोणी गायचेच नाही का? का म्हणून तिचे कुठलेही गाणे “बेस्टच”? मी तर आशाच्या ‘कतरा, कतरा…” वर जीव ओवाळून टाकायला तयार आहे. एवढेच नाही तर ‘स्वानंद किरकिरे’ च्या ‘बावरा मन…” वर हजारो गाणी कुर्बान….काय वेडावून टाकते ते गाणे!! असेल आंबा फळांचा राजा, पण संत्र्याला स्वतःची चव आहे, उसाच्या रसाला आगळेच माधुर्य आहे. अरे, असेल सचिन बेस्ट, पण युवराजचा लेफ्ट हॅन्ड ड्राईव्ह लाजवाब, त्याचा माज पैसा वसूल (२०-२० चे सहा सिक्स? आणि आठवा फ्लिंटऑफ चा चेहरा) आणि गांगुलीचे ऑफ-साईड चे फटके….अफलातून! :)

मग ह्या मीडिओक्रिटी च्या perception चे दुसरे टोक, शिखर म्हणू हवे तर – ते “पर्फेक्शन”..ते काय? जर ते ‘पर्फेक्ट’ असेल तर ते नेहमीच ‘बेस्ट’ हवं…मग पुन्हा तो प्रश्न, की तुलना करायची तर कशाशी आणि कोणा-कोणाशी? एक परिघ वाढवले की हे सगळेच किती फोल आहे, हास्यास्पद आहे हे जाणवू लागते…आणि मीडिओक्रिटी हे फक्त perception च आहे हेही जाणवते…पर्फेक्शनचा, परिपुर्णतेचा ध्यास, विलोभनीय आहे पण परिपुर्णतेचा अट्ट्हास??? विचार करण्यासारखा प्रश्न आहे….ध्यासात भर आहे तो आपल्या कर्तुत्वावर (प्रोसेसवर), तर अट्ट्हासात अवाजवी भर आहे त्याच्या अनुकुल परिणामांवर (रिसल्ट्सवर)…शिवाय perfection is not a certain/fixed set of XYZ items or formulae. Otherwise perfection would be stagnation.

Hugh Prather म्हणतो, “There is no such thing as ‘the best’ in the world of individuals!” सही आहे!!!

किंबहुना, ह्यातुनच वाटले की जर खरोखरच जे करतो ते मनापासून आवडत असेल, ते करण्यात मजा येत असेल (process satisfaction) तर इतका त्रास होईल का? नैसर्गिक हेवा वाटेल कदाचित, पण चढत्या भाजणीने हे असूया/मत्सर्/द्वेष मनस्वास्थ खराब करतील? ह्या गळाकापू स्पर्धेत खरच आपण process satisfaction विसरत आहोत का? End goal satisfaction हेच एकमेव ध्येय झाले आहे? कॉर्पोरेट जगात हे नेहमीच दिसते पण कलेच्या, सर्जनशील जगात जेव्हा राजीव नाईक ह्यांनी असे लिहिले, तेंव्हा अंगावर सरसरून काटा आला…पण शेवटी कॉर्पोरेट जगात किंवा सर्जनशील जगात, कुठेही असला तरी माणूस हा माणूसच – त्याच्या सगळ्या गुणावगुणांसह!

जर ह्या संदर्भात – बेस्ट/पर्फेक्शन त्याची कॅलिडोस्कोप प्रमाणे दिसणारी विविध रूपं, त्याची relativity (आता मला आवडते आशा जास्त, लताचा आवाज स्वर्गीय आहे मान्य करून सुद्धा!), त्याप्रमाणे स्वतःचे स्वतःच्या मीडिओक्रिटी चे perception आणि process satisfaction; ह्या संदर्भात विचार केला तर मीडिओक्रिटी स्विकारायला, पचवायाला जमेल; इतकेच नाही तर त्याच्यावर मात करायलाही जमेल असे वाटते.

आपण सुरु करावे जे आपल्याला मनापासून करावेसे वाटते ते….जमेल तसे….आपल्या तथाकथित मीडिओक्रिटी सकट….परिपुर्णतेचा ध्यासाने, पण अट्टहासाने नाही…आणि मागे वळून, तृप्त होऊन बघावे स्वतःच्याच प्रगतीकडे… बघावी कालच्या अडखळणार्‍या, मीडिओकर पावलांची आजची डौलदार लय…कोणी पळत असेल शेजारी तर त्याची धाव, त्याची गती त्याला मुबारक….आपण करत रहावा आपला प्रवास आपल्या पायांनी, आपल्याच गतीने…स्वांतसुखाय! :)

हे एकदा आतून उमगले की नाही कलह होत स्वत:शी, स्वतःच्या मीडिओक्रिटीशी…अर्थात, हे सगळे माहित असले तरी ‘माहित असणे’ आणि ‘उमगणे’ ह्यात खूप अंतर असते…अंतर असते कदाचित कित्येक वर्षांचे, कधी कधी कित्येक आयुष्यांचे….आणि आयुष्य संपले तरीही न उमगणे ही पण एक दुर्दैवी शक्यता…आणि त्यात ‘राजीव नाईक’ म्हणतात तसा तो ‘भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार’ आणि त्याचे ते ‘रिपीटिटीव्ह’ अविष्कार! भयानकच पण सत्य!! हे नाटक नक्कीच बघणार …जमले तर पुस्तक मिळवतो आधी.

असो!! फार वाहवत गेलो….एकातून एक…लाऊड थिंकींग म्हणा! तुम्हाला काय वाटते, बर्‍या-वाईट प्रतिक्रिया जरूर लिहा!

barech kahi ugavoon aalele by D B Dhamnaskar एका मैत्रीणीच्या, क्षिप्राच्या सांगण्यावरून नुकतेच हे पुस्तक घेतले, आणि ह्या कवितांच्या प्रेमातच पडलो. अतिशय सहज-सोपी भाषा, पण प्रगल्भ विचार आणि कल्पना. झाड, पक्षी, आकाश, निसर्ग ह्याच्यांभोवती गुंफलेल्या बहुतेक कविता – आणि त्यातून झिरपणारा अविरत माणुसकीचा, संवेदनशील, प्रेमळ व समंजस तत्वज्ञानाचा झरा! केवळ अफलातून!! अतिशय प्रभावी व खोलवर स्पर्शून जाणार्‍या ह्या कविता आहेत. त्यात काही मुलीविषयी, नातवाविषयी, आईविषयी आणि पोरक्या, गरीब मुलांविषयी देखील कविता आहेत; पण त्यांच्या कवितांमधून लक्षात राहतो तो सर्वव्यापी, सर्वसामावेशक निसर्ग आणि त्याची असंख्य रुपे आणि रुपके.

संदिप खरेची कवितांची पुस्तके हजारोंनी खपत असतांना ह्या पुस्तकाचे नावही पुस्तकांच्या दुकानदारांना महित नव्हते हे बघून अतिशय दु:ख झाले, एक पुस्तकासाठी १० दुकाने पालथी घातली तेंव्हा ‘साधना’ मध्ये एकदाचे ‘युरेका’ झाले. अर्थात दुःख झाले, पण आश्चर्य नाही वाटले – संदिप खरे, सलिल कुलकर्णी presentation (सादरीकरण? बापरे! :) ) मुळे लक्षात राहतात शिवाय त्यांच्या कविताही सहज-सोप्या आणि लोकप्रिय. असो! मुद्दा संदिप खरेच्या कवितांचा नाही (त्यावर लिहिणारे बरेच आहेत) – द. भा. धामणस्कर ह्यांच्या कवितांचा आहे. ह्या कविता एका वेगळ्याच अभिरुचीच्या आणि जाणिवेच्या आहेत – धामणस्कर ह्यांच्यावर जे. कृष्णमुर्ती ह्यांच्या विचारांचा प्रभाव आहे; त्यांच्या कवितांमध्ये आस्था व समंजसपणा प्रसन्नतेने दरवळतांना जाणवतात. त्यांच्या कवितांमधे दुःख असले तरी वैफल्य, उद्वेग नाही; एक सहज, समजुतदार स्वीकार जाणवतो. त्यांच्या कविता ह्या expression (अविष्कार, उस्फुर्त प्रतिक्रिया ह्या अर्थानी) पेक्षा reflection (चिंतन) च्या पातळीवर आहेत असे वाटते. आपल्या अनुभवांकडे, भावनांकडे सह्रद्‍यतेने पण दूरस्थपणे पाहण्याची दुर्मिळ प्रगल्भता आणि सजगता धामणस्करांकडे आहे. त्यातूनच हे ‘बरेच काही उगवून आलेले’ बहरून आले आहे.

त्या पुस्तकातील माझ्या काही आवडत्या कविता -

साधना

तृषार्ततेच्या काठावरील पाखराला
आपल्या असण्यामुळे पाणी पिण्यास संकोच वाटला तर,
आपला म्हटले त्यानेच परका मानल्यावर
आपण करतो तेच करायचे; त्याच्या वाटेतून
त्याच्या सोयीसाठी दूर व्हायचे….तरीही पक्षी
कुठल्या पाइपलाईनमधून थेंब थेंब ठिबकून जमलेल्या
निवळशंख पाण्याला शिवत नसेल तर
पाण्यात आपण आहोत असे जाणून
आणखी दूर जायचे. पक्ष्याला
पाण्यात फक्त आकाश दिसेपर्यंत
कसलाच भरवसा वाटणार नाही…

कुणाला संकोच वाटत असेल तेव्हा
कणवपूर्ण हृदयाने स्वतःला दूर करणे ही
साधनेची सुरुवात; सांगतेचा क्षण आला की
तुम्हीच आकाश झालेले असता. मग
जलाशयाच्या अगदी काठावर उभे राहीलात तरी
पाण्यात फक्त आकाशच असेल. एखाद्या
हुशार पक्ष्यालाही तुम्हांला
आकाशापासून
वेगळे करता येणार नाही…

परिपक्व झाडे

रात्री सुचलेली गाणी झाडांना
सांगायची नाहीत असे ठरवल्यापासून
पाखरांनी एकच धरलंय :
झाडांना जाग येण्यापूर्वीच
आकाशवाटांनी निघून जायचं आणि
दिवस मिटल्यानंतरही झाडांत
लवकर परतायचं नाही …

मुकी झाडे अनाग्रहीपणे
पक्ष्यांचे स्वातंत्र्य एकदम मान्य करतात;

गाणे आपल्याच कंठात उद्‌भवते हा गैरसमज
त्यांचा त्यांनाच उमगेपर्यंत झाडे
वाट पाहावयास तयार आहेत…

समुद्राविषयी
१.
सर्व नद्या, इच्छा असो-नसो,
समुद्राला मिळतात. त्यांच्या
निमुट आसवांनी सारा समुद्रच
खारट करून टाकलेला.

२.
समुद्र आपल्यासारखाच : दुःखी.
त्याच्या विव्हळण्याचा
समुद्रगर्जना म्हणून प्रथम
कुणी अधिक्षेप केला?
आवेगाने किनार्‍यापर्यंत
वाहत आलेल्या त्याच्या अश्रूंना
भरती कुणी म्हटले आणि
डोळ्यात जमणारे पाणी मागे
खेचणार्‍या निग्रहाला ओहोटी?

अजून काही ओळी ‘नक्षत्रे’ कवितेतील…

नक्षत्रे

……..
४.
रात्रभर,
सगळे तारे माझेच असल्यासारखा मी
त्यांच्याकडे पाहत राहिलोय;
उजाडताना, मीही आकाशासारखाच
पुन्हा कफल्ल्क होणार आहे…

आणि ही शेवटची एक अफलातून कविता; ‘सार’ म्हणावे ह्या योग्यतेची. सगळ्या आयुष्याच्या प्रवासाकडे, त्यातल्या अनुभवांकडे, त्यातून उमगलेल्या आणि झिरपलेल्या ज्ञानाकडे बघण्याचा एक विलक्षण दृष्टीकोन!

बरेच काही उगवून आलेले

तुझ्या इच्छेप्रमाणेच
वणवण केल्यानंतर
जरा मागे वळून पाहिले तर
या क्षुद्र जंतूच्या हळव्या पायांना
यदृच्छया चिकटलेल्या परागकणांतून
बरेच काही उगवून आलेले….

अजूनही कित्येक मोती विखुरले आहेत या पुस्तकात. पुस्तकातील सगळ्याच कविता इथे देण्याचा उद्देश नाही; मला अतिशय आवडलेल्या ह्या कवितांच्या पुस्तकाची ओळख करून द्यावी असे वाटले, एवढेच. आवर्जून विकत घेऊन वाचावे असे हे – बरेच काही उगवून आलेले!

Let it go…

Another old poem of mine, wanted to put it here with an appropriate image – found that image finally!

Two Monks

As I hold on to those memories, agonies and pain,
Someone inside me whispers, let it go.
I close my eyes and tears fall silently,
And it all comes back again.
Heartbreaks, back stabbing, lies and betrayals,
My heart weeps and again a tear slips.
I carry it all on my shoulder,
In this darkness, time and again I flounder.
I look around in search of the light,
I look within myself for some peace.
So many memories, so much pain and not a shoulder to cry,
Helplessly, I look up and wonder ‘Why?’
But why is never answered and I wonder ‘How?’
How do I heal, how do I find my solace.
And inside me someone whispers, let it go!
No matter how much you are hurt, never let it show,
Don’t waste your tears for those who are not worth it.
Prove you mettle, bear it with grin, get up after every blow,
For no one else, but for yourself, let it go!

Look up at the sky and let it go,
Look at the ocean and let it go,
Look at the mountains and let it go.
Think about the future, its promise and let it go.
Think about the kids, their innocence and let it go.
Think about a mother, her benevolence and let it go.

It’s over when it’s over, get over it,
Bury it deep, never carry it along;
You’ll get tired, because the road is going to be long.
Drop the excess baggage, come on, get going,
Time is running, and the sky is waiting.
Move on, cheer up, let yourself grow,
When you’ll reach up there, you’ll know,
The best way is to let it go!

I whisper it to myself, “Let it go!”
And I see two monks across the river,
Along with the beautiful lady, sing in chorus,
“Let it go, let it go!”

© Manish Hatwalne
(Originally written on : 16 December 2001)

« Newer Posts - Older Posts »