आनंदवन प्रयोगवन (Anandwan – Prayogwan)


‘आनंदवन प्रयोगवन’ हे डॉ. विकास आमटेंचे पुस्तक नुकतेच वाचले. आनंदवन, बाबा आमटे ह्यांचे कार्य, शिवाय साधनाताईंचे ‘समिधा’ आणि डॉ. प्रकाश आमटे ह्यांच्या ‘प्रकाशवाटा’ ह्या पुस्तकांमधून आनंदवन आणि त्यांचे इतर प्रकल्प ह्यांची ओळख आहेच, तरीही गेल्याच महिन्यात आनंदवनला गेलो असतांना तिथले विविध उद्योग आणि आनंदाने आपल्या कामात रमलेली माणसे बघून स्तिमित झालो होतो. प्रत्यक्ष आनंदवनातल्या ह्या उद्योगांविषयी आणि प्रयोगांविषयी मलातरी आधी फारसे माहित नव्हते. तिथल्या परांजपे काकांनी ह्या वेळेस खूप सविस्तर माहिती दिली आणि बरेचसे काम प्रत्यक्षही पाहता आले.

आनंदवन प्रयोगवन

आनंदवन प्रयोगवन

तशातच हे पुस्तक वाचायला मिळाल्यामुळे बरीच उत्सुकता होती. हे लिखाण ह्या पुस्तकाचे परीक्षण नाही, पण त्या निमित्ताने मला त्यातले जे आवडले, सध्या मी जो विचार करतो आहे, इतर जे काही वाचतो आहे त्या अनुषंगाने जे महत्त्वाचे आणि संबधित वाटले तेच लिहायचा हा प्रयत्न आहे. शिक्षणाने डॉक्टर असले तरी आवड इंजिनिअरींगची आणि खोलात जाऊन, विषय समजून घेऊन प्रयोग करण्याची इच्छा, ह्यामुळे डॉ. विकास ह्यांनी ‘आनंदवन MIDC’ (हा खास ह्या पुस्तकातला शब्दप्रयोग) इथे अक्षरशः उद्योगांचे जाळे उभारले आहे आणि हे उद्योग आता कित्येक कोटींची उलाढाल करतात ती निव्वळ त्या उत्पादनांच्या दर्जाच्या जोरावर! आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे कित्येक अपंग आणि कुष्ठरुग्णांनी हे उद्योग समर्थपणे चालवले आहे. मला माहित नसलेला आणि खूप भावलेला ह्या पुस्तकातला भाग आहे तो डॉ. विकास ह्यांची शास्त्रीय, अभ्यासू , जिज्ञासू वृत्ती आणि प्रयोगशीलता. आनंदवनातील महत्त्वाच्या पाण्याच्या प्रश्नासाठी त्यांनी वेगवेगळ्या जमिनीच्या सॅंपल्सची केलेली चाचणी आणि अक्षरशः भगीरथ प्रयत्न करून खणलेले ते तलाव, बोअरवेल आणि नंतर जोपासलेली ‘वॉटर रिचार्ज’ ची सायकल. तसेच मग टीन कॅन प्रोजेक्ट, मेटल फॅब्रिकेशन उद्योग, पॉवरलूम्स (जे L & T ला पुरवठा करतात), शेतीचे प्रयोग, डेअरीचे प्रयोग, ग्रीटिंग्ज कार्डस, प्लॅस्टीकचा उपयोग हे मुळातूनच वाचण्यासारखे आहे. तसाच मला आवडलेला अजून एक भन्नाट प्रयोग म्हणजे ‘न्युबियन व्हॉल्ट’ पद्धतीची घरे – नुसतीच आनंदवनात नाही तर किल्लारील्या भुकंपानंतरही आनंदवनवासियांनी ही घरे किल्लारीत बांधून तिथल्या रहिवाश्यांना शिकवण्याची इच्छा दाखवली (त्यात मग राजकारण आणि इतर नोकरशाहीमुळे येणारे अनुभव हा वेगळा भाग). आनंदवनचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे स्वावलंबन आणि इतरांनाही उचलून आर्थिक किंवा वस्तूरुपी मदत देण्याऐवजी त्यांची इतरांना स्वयंपुर्ण व्ह्यायला मदत करण्याची, शिकवण्याची वृत्ती. बाबा आमटे ह्यांची आनंदवनाला लोकांशी जोडून ठेवण्याची आणि समाजाचे देणे द्यायची दूरदृष्टी त्याच्या कित्येक उपक्रमात अजूनही जाणवते. अजूनही खूप काही सांगण्यासारखे आहे ह्या पुस्तकामधून, पण त्यापेक्षा हे पुस्तक स्वतःच वाचणे जास्त योग्य. आनंदवन काय आहे, तिथे नेमके काय चालते आणि गेली कित्येक दशके त्यांनी किती वेगवेगळे प्रयोग आणि प्रेरणादायी काम केले हे समजून घेण्यासाठी गौरी कानेटकर ह्यांनी शब्दबद्ध केलेले हे पुस्तक अतिशय महत्वाचे आहे.

पण हे फक्त आमटे कुटुंबानेच केले असे नाही, ही आनंदवन, सोमनाथ, लोकबिरादरी आणि संबधित कित्येक प्रकल्पांवर काम करणार्‍या सगळ्याच कार्यकर्त्यांची गोष्ट आहे. स्वतः बाबा आमटे त्यांच्या नातवंडांना म्हणत असत – ‘तुमच्यासारखे अनेक आले नि गेले…’. ह्याविषयी नुकतेच कौस्तुभ आमटे ह्यानेही लिहिले आहे. त्यामुळे आनंदवन उभे आहे, अनेकांना प्रेरणा देते आहे ते अशा शेकडो कार्यमग्न कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि ते तसेच राहो अशी मनापासून इच्छा आहे.

तिथले उद्योग, त्यातले वैविध्य (१४० प्रकारचे उद्योग/उपक्रम) आणि त्यात काम करणारे लोकं हे एक वेगळेच प्रकरण आहे. गजानन वसू सारखा सातवी पास, कृष्ठमुक्त रुग्ण हा कित्येक प्रयोग करत ‘सिरीअल आंत्रप्रेन्युअर’ होतो आणि निव्वळ डेअरीची उलाढाल कोटींच्या वर नेतो हे निश्चितच दाद देण्याजोगे आहे. आज फेब्रुवारी २०१५ मध्ये आनंदवनातले दूध ६० रुपये लिटर आहे, जे अर्थातच कित्येक शहरांपेक्षाही महाग आहे. पण ह्या चढ्या भावाने ते सहजच विकले जाते ते केवळ दर्जाच्या आधारावर. हे मला फार आवडले – आश्रय, दया ह्यांच्याऐवजी आनंदवनातले रहिवासी (ह्यात कृष्ठरोगी , कृष्ठमुक्त रुग्ण, शारिरीक अपंगत्व असणारेही आहेत – पण ते खरंच इथे गौण आहे) स्वतःच्या जिद्दीवर आणि कौशल्यावर उत्तमोत्तम निर्मिती करतात आणि दर्जाच्या जोरावर बाजारपेठ मिळवतात हे किती प्रेरणादायक आहे! कित्येक कारखान्यात कुशल कामगारांनाही प्रोत्साहित करून सतत उत्कृष्ट उत्पादन करणे ही व्यवस्थापनाची एक प्रमुख कसोटी असते, पण इथे तर अतिशय प्रतिकुल परिस्थितीतही हे आनंदवननिवासी निरंतर उत्कृष्टतेचा ध्यास घेतलेले आहे आणि ते मनापासून त्यांचे काम एंजॉय करतात हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. तिथली उर्जा, आंनंदीपणे कार्यरत रहाण्याची वृत्ती कमालीची प्रेरणादायी आणि संसर्गजन्य आहे. मी काही दिवस आधी ब्लॉगवर Mihaly Csikszentmihalyi ह्याच्या flow ह्या कल्पनेविषयी लिहिले होते. स्वतःच्या कामात कौशल्याने, तन्मयतेने मग्न असणे आणि कामाचा पुरेपूर आनंद मिळणे हे flow चे सार म्हणता येईल. ‘मेल ब्रूक्स’ हा Group Flow मध्ये अतिशय कुशल आणि मोटिव्हेटेड टीम विषयी सांगतो, मला वाटते, आनंदवनात हा Group Flow फार छान जमला आहे. कामातला, प्रयोगातला, निर्मितीतला निखळ आनंद ही जणू काही इथली कार्य-संस्कृतीच आहे. डॉ. विकास आमटे ह्यांनी ह्या पुस्तकात हे अतिशय सुंदरपणे लिहिले आहे जे माझ्या मते ह्या प्रयोगवनाच्या वृत्तीचे आणि कार्यपद्धतीचे अगदी चपखल सार आहे –

आमच्याकडे हे एक वेगळंच स्पिरिट आहे. माणसं उत्साहाने ओसंडत असतात. काही नवं करायचं म्हटलं की त्यांच्या अंगात वीरश्री संचारते. सगळे बाह्या सरसावून कामाला लागतात. रात्र-रात्र माणसं वर्कशॉपमध्ये काम करतांना दिसतात. बाबांना ह्या उत्साहाचं जबरदस्त कौतुक होतं. असा एखादा नवा प्रयोग करायचा झाला की ते आमच्या पुढे असत. रात्रीतून दोनदोनदा चक्कर मारत. माणसांना मनापासून आणि आनंदाने काम करतांना बघण्याएवढा आनंद कशातही नाही, असं ते नेहमी म्हणत. सुदैवाने हा आनंद आम्हा सगळ्यांना भरभरून मिळाला.

अशा प्रयोगांमुळे आनंदवनात किती नवनव्या वस्तू तयार झाल्या असतील याची मोजदादच नाही. त्यातल्या ज्या वस्तू उपयोगी पडल्या, किफायतशीर ठरल्या त्यांचं उत्पादन पुढे सुरू राहिलं, बाकीचं बंद झालं.

~ ‘आनंदवन प्रयोगवन’ ह्या पुस्तकातुन

स्वतःच्या काही शारिरीक किंवा इतर मर्यादा असूनही स्वतःच्या प्रयोगांचा, निर्मितीचा आनंद घेत, उत्कृष्टतेचा ध्यास घेत अगदी समरसून काम करता येते ह्याचे इतके मोठे आणि चांगले उदाहरण आपल्यासमोर आहे, हे किती छान आहे ना?

Update – 6 April 2015

स्टार माझावर काल (५ एप्रिल २०१५) प्रसारीत झालेला आनंदवनाविषयी कार्यक्रम!

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s