पुस्तकांचे देणे


खूप लहानपणी जळगावला राहत असतांना घराजवळ, मोरॅको रेस्टॉरंटजवळ समोरासमोर दोन पेपरचे स्टॉल होते आणि तिथे बरीच गोष्टींची पुस्तकंही मिळायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत आई-बाबांना पटवून कित्येक पुस्तकं विकत घ्यायचो आणि घरात किंवा बाहेर बागेत वाचत असायचो तासंन-तास! अगदी काल-परवापर्यंत त्यातील ‘जांभळ्या दाताची राजकन्या’ होतं माझ्याकडे, मग कुठे गेलं काय माहित! असो! तिथेच चाचा-चौधरी आणि प्राणचे इतर कॉमिक्सचही भेटले – आणि मग बरेच वर्षं त्यांनी साथ दिली.

मग शाळेत वेड अजूनच वाढले, काही शिक्षकांमुळे तर काही लायब्ररीमुळे. पुण्यात सहकारनगरमधल्या घराजवळच एक घरगुती लायब्ररी होती मुलांसाठी – तिथून काय मिळेल ते वाचायचो! अर्थातच ‘लंपन’ होता आणि चिं. वि. जोशींचे ‘ओसाडवाडीचे देव‘ हेही फार आवडले होते. पुढे मग फास्टर फेणे सापडला आणि अगदीच जवळचा झाला – त्याचे सगळेच भाग मिळवून संग्रही ठेवले. काही मित्र तेंव्हा हार्डी बॉइज, सिक्रेट सेव्हन वाचायचे, पण आम्ही मात्र फाफेचेच फॅन होतो! भारांनीच मग ज्यूल्स व्हर्नची ओळख करून दिली आणि व्हिडीओ लायब्ररीच्या कृपेने त्याच्या कथांवरचे काही चित्रपटही पाहिले. ओरिजिनल पुस्तकं त्यामानाने खूप उशीरा फ्रेंच शिकतांना वाचली. मग काही काळ राधेय, मृत्युंजय, पावनखिंड हेही वाचले पण फार नाही गुंतलो त्यात. तेंव्हाच कधीतरी रणजित देसाईंचे ‘अभोगी’ वाचले आणि त्या वेळेस ते बरेच आवडले होते. शाळा-कॉलेजच्या सीमारेषेवरच कधीतरी जेफ्री आर्चर, फ्रेड्रीक फोरसिद, रॉबिन कुक ही मंडळी सापडली आणि काही वर्ष त्यांच्यातच गुंतलो होतो. तेंव्हाच कधीतरी ‘रारंग ढांग‘ वाचली आणि ती अजूनही आवडते. त्याच काळात आयन रँडची ‘फाऊंटनहेड‘ आणि ‘अ‍ॅटलास श्रग्ग्ड‘ वाचली – खूप काळ त्यांनी प्रभावीत झालो होतो, पण नंतर त्या विचारांपासून बराच दूर गेलो. तिची स्वतःची कथा कळल्यावर ते लिखाण कुठून आले असेल हे लक्षात आले. आता आयन रँडच्या लेखनाकडे बराच संतुलित पाहू शकतो असे वाटते.

नंतर सिनिअर कॉलेजच्या वर्षांत रिचर्ड बाखची ‘इल्युजन्स‘, ‘नथिंग बाय चान्स‘, ‘ब्रिज अ‍ॅक्रास फॉरेव्हर‘ वाचली आणि तेंव्हा तो खूप आवडायचा. जेम्स रेडफिल्ड चे ‘द सेलेस्टाईन प्रॉफेसी’ वाचले तेही तेंव्हा आवडले होते, आता फारसे आठवतही नाही. जे. कृष्णमुर्ती ह्यांची ‘कॉमेंट्रीज ऑन लिव्हींग’ ही तीन पुस्तकांची बरीच जड  सिरीजही तेंव्हा वाचली. खरंतर ह्यातील कित्येक पुस्तकांबद्दल मित्रांशी फारसे बोलता यायचे नाही, बर्‍याच जणांना ती पुस्तक माहितही नसायची पण मी वाचत रहायचो मला जे आवडेल ते. मित्रांच्या संगतीने थोडे ‘सेल्फ-डेव्हलपमेंट’ चेही भूत चढले होते – मग डेल कार्नेजीची काही पुस्तकं वाचली, पण त्या प्रकारातली सेल्फ-हेल्प पुस्तकं फार काही आवडली, भावली नाही. पण त्याच नादाने वाचलेलं ‘वर्ड पॉवर मेड इझी‘ हे नॉर्मन लुईसचे पुस्तक फारच आवडून गेलं – त्यामुळे एटिमोलॉजीची, शब्दांचे मूळ शोधायची जी आवड लागली ती लागलीच. मग कधीतरी कॉलेजातच फिक्शन वाचणं जवळपास बंदच झाले, कधी झालं ते आता आठवत नाही. थोडेफार पुलं, वपु वाचायचो आणि कवितांचीही आवड सुरू झाली ती त्याच वयात! तेंव्हा नॉन-फिक्शन सुरू झाले आणि आज विचार केला तर बहुतांशी प्रभाव टाकणारी, आवडणारी पुस्तकं आहेत ती नॉन-फिक्शनच – ह्याला अर्थातच ‘रारंग ढांग’ सारखे काही अपवाद आहे आणि अजून एक सणसणीत सनसणीत अपवाद आहे तो जी. ए. कुलकर्णींचा. ते त्यामानाने उशीराच गवसले, आणि तो एक वेगळाच ठेवा आहे. सुट्टीच्या निवांत दुपारी जीए वाचतांना वेगळ्याच जगात जातो, आणि नंतर कित्येक दिवस ते गारूड उतरत नाही.

कधीतरी देशी-विदेशी आत्मचरीत्र/चरीत्र हाती लागली आणि त्यात बराच रस आला. तेंव्हाच अनिल अवचट असेच एका दिवाळी अंकात सापडले आणि त्यांचे पहिले पुस्तक वाचले तेच मुळी ‘कार्यरत‘ आणि मग ‘माणसं!’, ही दोन्ही पुस्तकं अजुनही प्रिय आहे. त्यांचं ‘स्वतःविषयी‘ वाचलं आणि तेही खूप आवडलं, मग त्यांची उपलब्ध असतील ती सगळी पुस्तकं मिळवून वाचली. मुक्तांगण तर्फे प्रकाशित ‘सुनंदाला आठवतांना’ हे असेच अतिशय आवडते पुस्तक! तीन पुस्तकं माझ्या अगदी आवडती होती/आहेत. अगदी भरभरून बोललो आहे मित्रांशी ह्यांच्याबद्द्ल. त्यांच्याविषयी ब्लॉगवरही खूप लिहिले आहे. अणि हो, ही पुस्तकं नुसतीच आवडत नाही , तर त्यांनी माझ्या विचारांवरही खूप परिणाम केलाय. त्यांचा अजूनही अनिल अवचट यांचा चाहता आहे, पण आता त्यांची सगळीच पुस्तकं नाही आवडत. असो! अवचटांच्या लेखनामुळेच हिंमतराव बाविस्कर, अभय बंग यांचीही ओळख झाली आणि त्यांची स्वतःची पुस्तकंही वाचली. पुढे अभय बंग यांच्या स्वतःच्या लेखनानेही खूप प्रभावित केले.

पुस्तकांनी काय-काय दिलंय त्याची मोजदादच नाही, त्या सगळ्याच पुस्तकांवर थोडक्यात जरी लिहीत बसलो तर त्याचेच एक स्वतंत्र पुस्तक निघेल. पण त्यातील काही पुस्तकांवर लिहायचा मोह आवरत नाही. वर अनिल अवचटांची पुस्तक आलीच आहेत, तसेच एक पुस्तक आहे अभय बंग यांचे ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग‘. किती विविध प्रकारे त्यांनी त्यांच्या आजाराचा किंवा एकूणच जीवनाचा विचार केला आहे ह्या पुस्तकात, अफाट आहे हे पुस्तक! मी फारसा एकच पुस्तक पुन्हा-पुन्हा वाचणारा नाही, पण ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ पुन्हा-पुन्हा वाचायला आवडते, वाचतांना प्रत्येक वेळेस नवीन काहितरी सापडते, कधी स्वतःच्याच तणावांची केलली वस्तुनिष्ठ चिकित्सा, कधी ध्यानावरचे त्यांचे विचार आणि असंच अजूनही कितीतरी! तसंच अजून एक पुस्तक म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी यांचे ‘स्वभाव-विभाव‘, रीतसर सायकोलॉजी आणि REBT शिकण्यापुर्वी वाचलेले हे पुस्तक. प्रत्येक वेळी वाचतांना ह्यातही नवीन काहीतरी सापडतेच. डॉ. अंजली जोशी यांनी लिहिलेलं ‘मी अल्बर्ट एलिस‘ हे डॉ. अल्बर्ट एलिस यांचे चरित्र तसेच स्वत: अल्बर्ट एलिस यांची पुस्तकं यांचा गेल्या काही वर्षात ह्यांचा विचांरावर खूप प्रभाव पडलाय.

रारंग ढांग‘ विषयी आधीही लिहिलं होतं, पण माझ्या आवडत्या पुस्तकांवर लिहितांना ह्याच्याविषयी न लिहिता पुढे नाही जाता येणार. हिमालयाच्या पार्श्वभुमीवरची, Border Roads Organisation बरोबर हिमालयात रस्ता बनवणार्‍या विश्वनाथची ही गोष्ट. त्याचे सखोल ज्ञान, थोडा एककल्ली हेकटपणा, आदर्शवाद आणि त्याच्या जोडीला वैतागलेला नायर आणि जिंदादिल मिनू. सगळे मिळून एक भन्नाट रसायन झालेय. पुढे कधीतरी डॉ. दाढेंशी गप्पांमधे कर्नल आनंदराव (पहिल्या नावाविषयी खात्री नाही, पण बहुदा हेच) जाधव यांनी लिहिलेल्या ‘जिंदादिल’ ह्या आत्मचरित्रपर पुस्तकाशी असलेल्या ह्या कादंबरीच्या नात्याबरोबर कळले. खूप शोधुनही हे ‘जिंदादिल’ अजुनही मिळाले नाहीच. असो. मी कॉलेजात ११-१२ वीत असतांना आमच्या मित्रांपैकी कित्येकांना डिफेन्स मधे जायचे भूत होते…. पण NCC तील seniors चे बेताल आणि मुजोर वागणे, त्यातल्या अधिकार्‍यांचे असंवेदनशील वर्तन ह्याबरोबरच ‘रारंग ढांग’ हे मला NDA पासून दूर ठेवण्याचे एक प्रबळ कारण होते. मला मानव आणि निसर्गापेक्षाही हा माणूस आणि व्यवस्था ह्यांच्यातला संघर्ष वाटतो. शेवटी विश्वनाथला विचारलेला प्रश्न “तुला अपेक्षित/अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य तुला ह्या बाहेरच्या जगात तरी मिळेल का?” ह्या प्रश्नाने पुस्तकाच्या बाहेर अयुष्यातही खूप वेळा छळले आहे. मुळातील मनस्वी, स्वच्छंद स्वभावामुळे, “तुला जे मनापासून करायचे आहे, ते खरच करता येईल का?” हा प्रश्न वेगवेगळ्या स्वरुपात भेटतच राहतो! हिमालयातील उंचावरचे रस्ते बघतांना कुठेतरी ‘रारंग ढांग’ मनात घुटमळता राहिले… इथेच कुठेतरी विश्वनाथने ‘ते’ स्मारक बांधले असेल का असा वेडा विचारही मनात येऊन गेला! 🙂 नंतर मग कधीतरी, कुठल्या ना कुठल्या कारणाने रारंग ढांग मधले मला भावलेले, कुठेतरी आत रुजलेल/रुतलेले प्रसंग मनात कळत-नकळत उमटत राहतात… ‘रारंग ढांग’ मला आवडते ते मुलतः त्यातील विश्वनाथच्या अंतर्गत संघर्षामुळे…आणि कित्येक वेळा आयुष्यात प्रसंग/डिटेल्स वेगळे असले तरी प्रश्नांचा पॅटर्न बराचसा सारखा असतो असे वाटते. वेळ आल्यास, स्वतःला खरच योग्य वाटणार्‍या निर्णयामागे खंबीरपणे उभे रहाण्याची आंतरीक शक्ति मिळावी, किंबहुना ती मिळवावी अशी तीव्र इच्छा प्रत्येकवेळेस हे पुस्तक वाचतांना होते. तशी आंतरीक शक्ति माझ्याकडे आहे का? प्रामाणिकपणे सांगायचे तर ह्या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर आजतरी माझ्याकडे नाही, पण ते तसे असावे ह्याची प्रेरणा देणार्‍या पुस्तकांत ‘रारंग ढांग’ चे स्थान खूपच वर आहे! असो!

खूप पुस्तकं आहेत- ह्यू प्रॅथर याचे ‘नोटस् टु मायसेल्फ‘ आणि ‘नोटस् टु इच अदर‘ ही खूप वर्षांपुर्वी वाचलेली पुस्तकं,आणि तेंव्हा खूप आवडली होती. आजही त्यातली काही वाक्य, जशीच्या तशी आठवतात –

What is the difference between ‘I want food’ and ‘I want sex’?
“Consent.”

आणि लक्षात येतं की वाचून कित्येक वर्ष झाली तरी प्रभाव आहेच – ते विचार जगण्याचाच भाग होतात! तशीच आवडती पुस्तकं आहेत कित्येक वर्षांपुर्वी वाचलेल्या रॉबर्ट फुलघम ह्या लेखकाची, खास करून त्याचे ‘मेबी (मेबी नॉट)‘ हे पुस्तक. तत्त्वज्ञान आणि रोजचे जगणे ह्यांची सांगड घालणारा आणि तत्त्वज्ञानावर इतके हलके-फुलके, आनंददायक लिहिणारा दुसरा लेखक मला तरी माहित नाही. त्या पुस्तकातील ‘बॅड एक्झँपल’, ‘बुलफाईट’, न्यूड मॉडेलचा किस्सा हे फार भन्नाट आहेत आणि तितकेच ते अंतर्मुखही करतात. एरिक फ्रॉमचे ‘टु हॅव ऑर टु बी‘ हे पुस्तक खूप वर्ष मी शोधत होतो (अमेझॉन आणि फ्लिपकार्ट च्या आधीचे दिवस होते ते!) आणि मग भावाने इंग्लंडहून आणले तेंव्हा लहानपणीसारखाच हरखलो होतो. ते पुस्तक वाचायला, समजून घ्यायला वेळ लागला पण ते कुठेतरी खोलवर झिरपले आहे हे बर्‍याच वेळा जाणवते. थोरोचे ‘वॉल्डन‘ ही अशीच एक मर्मबंधातली ठेव आहे.

डेंजर: स्कूल‘, ‘ फ्री फ्रॉम स्कूल (राहुल अल्वारेस)‘, ‘लर्निंग द हार्ट वे (संयुक्ता)‘, ‘डंबिंग अस डाऊन (जॉन गॅटो)‘, ‘डिसिप्लिन्ड माइंडस् (जेफ श्मिड्ट)‘, ‘व्हाय वी वर्क (बॅरी श्वार्झ)‘ अशी अजून कित्येक पुस्तकं डोळ्यांसमोर येतात. शिक्षणाविषयी, आपल्या कामाविषयी अगदी मुलभूत प्रश्न विचारून ह्या पुस्तकांनी माझ्या दृष्टीकोनात किती बदल घडवलाय हे जाणवतंय. ‘व्हाय वी वर्क‘ विषयी मी माझ्या एका ब्लॉगवर अलीकडेच प्रदीर्घ लेखही लिहिला होता. तसाच बदल ‘इट टु लिव्ह (जोएल फुहर्मन)‘, ‘रिव्हर्सिंग डायबेटीस (डॉ. नील बर्नार्ड)‘ ह्या पुस्तकांनी आहारविषयी/डाएट विषयी घडवला आहे, त्यांच्या तुलनेत सध्याची भारतातील प्रसिध्द आहारतज्ञ किती उथळ आहे हेही जाणवते. असो! खूप आहेत पुस्तकं आणि त्यांचे किस्से – कितीही लिहिले तरी अजून आठवतातच! आवडत्या पुस्तकांपैकी १०% पुस्तकांवरही लिहिता येणार नाही इथे!

तरी कवितांविषयी लिहिले नाही तर मलाच अपुरे वाटेल. आधी कवितांविषयी प्रेम असले तरी कवितांची पुस्तक विकत घेऊन वाचायची फार सवय नव्हती. पण तरीही अगदी सिनेमातील गाण्यांच्याही शब्दांकडे लक्ष असायचेच. मुळात शब्दप्रधान गायकीच जास्त आवडायची, तशातच अगदी लहानपणीच उर्दू गज़ल भेटली आणि कदाचित कवितांच्या प्रेमाचे मूळ तिथेच असावे. कविता वेगवेगळ्या भाषांतून, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ठिकाणी माझ्याच भावना घेऊन मला भेटली. सुरेश भट फार आवडायचे/आवडतात. शिवाय विंदा आणि बोरकरही आहेतच, विंदाची ‘चुकली दिशा तरीही…’ अगदीच जवळची. पाडगावकर आधी फार बाळबोध आणि बालिश वाटायचे. नंतर त्यांच्या कवितांमधल्या साधेपणातले सौंदर्य जाणवले. मग कधीतरी त्यांच्या कवितांमधली खोलीही जाणवली. मग असेच धामणस्कर सापडले आणि ते तर फारच भावले, त्यांच्या कवितांवर मी स्वतंत्र लेख लिहिला होता. त्यांची ‘साधना’ ही अगदीच खास आहे. पाशची “सबसे ख़तरनाक होता है, हमारे सपनों का मर जाना” वाचून आजही अंगावर काटा येतो. तशीच मनापासून  आवडते हरिवंशराय बच्चन यांची “पर बोलो टूटे तारों पर कब अम्बर शोक मनाता है – जो बीत गई सो बात गई”! मग तशीच फ़ैज़ची “शीशों का मसीहा कोई नहीं, क्या आस लगाए बैठे हो” आहे. गुलजा़र आहे म्हणजे आहेच आहे! उर्दू यादी फारच मोठी आहे! तसाच चार्ल्स बुकोवस्कीही अचानक गवसला आणि तो अगदी माझाच कवी झाला. अलीकडे अरूण म्हात्रे, दासू वैद्य यांच्याही कविता आवडतात. कविता हे एक वेगळंच प्रकरण आहे, खरंतर दुखणं आहे – कविता लिहिण्याचे, वाचण्याचे दिवस-रात्री निरतिशय सुख देतात तसेच ठसठसणारी दु:खही देतात. तसेच कविता जाणवण्याचे काही लख्ख आरस्पानी क्षण पदरात पडतात तेंव्हा टचकन डोळ्यात पाणी येते – न सुखाचे, न दु:खाचे. फक्त एक खोलवर ओली जाणीव होते, कुठेतरी अनंताशी तार जुळल्याची. जाऊ दे! त्रास देतात कविता!

आपण जो विचार करतो, जसे वागतो किंवा जगतो त्यामागे कित्येक व्यक्तिंचा, पुस्तकांचा, चित्रपटांचा किंवा इतर अनेक गोष्टींचा प्रभाव असतो. मला आपले उगाचच वाटते की मी बराच स्वतंत्र विचारांचा आहे आणि मुळातूनच वेगळा आहे, पण ह्या पुस्तकांच्या आठवणींच्या निमित्ताने जाणवते की कित्येक न पाहिलेल्या विचारवंतांनी/लेखकांनी किती प्रभावीत केलंय मला त्यांच्या पुस्तकांमधून. खरंतर माझे विचार तसे होते म्हणून त्या पुस्तकांनी मी प्रभावित झालो की ती पुस्तकं आवडली म्हणून विचारांवर प्रभाव पडला हे कोडे बर्‍याच पुस्तकांच्या बाबतीत अजुनही उलगडत नाही. जाऊ दे, काही कोडी न उलगडण्यातच गंमत असते!

पुस्तकांसंबंधी फार लोभस आठवणी आहेत – आईची वाचायची आवड, तिची लायब्ररी, मग तिने पुण्यात आल्यावर मला लावून दिलेली लहान मुलांची लायब्ररी, तिथे सकाळी नेलेले पुस्तक संध्याकाळी बदलून मागितल्यावर कौतुकाने वैतागलेले काका, बाबांच्या मागे हट्ट करून विकत घेतलेली पुस्तकं, दिवाळीत फटाक्यांचे पैसे वाचवून घेतलेली पुस्तकं, अशा खूप-खूप आठवणी आहेत. तशीच मीना आँटींची भांडारकर रोडवरची ‘रीडर्स डेन’ लायब्ररी आठवते, तिथे त्यांनी सुचवलेली कित्येक पुस्तकं आणि तिथल्या त्यांच्याबरोबरच्या गप्पाही आठवतात. त्या इतक्या प्रेमळपणे आणि आस्थेने बोलायच्या की वेळेचं भान रहायचं नाही.

मग ‘ती’ भेटली आणि नंतर कधीतरी तिलाही रिचर्ड बाख, ह्यू प्रॅथर आवडतात हे कळल्यावर झालेला मनापासूनचा आनंद अजुनही आठवतो. आम्ही तेंव्हा बर्‍याच वेळा भेटायचोही ‘पाथफाईंडर’ मधेच आणि आजकाल ‘पगदंडी’ मधे आनंदाने तासन्-तास बसू शकतो. अजुनही नवीन, आवडीचे पुस्तक मिळाले की माझे डोळे लहान मुलासारखे चमकतात! लहान मुलावरून आठवलं, आमच्या साडे-सहा वर्षाच्या पिल्लूलाही हेच पुस्तकांचे वेड लागलंय – त्याच्या शेल्फवरचे २-३ कप्पे पुस्तकांनी भरलेत. माधुरी पुरंदरे त्याच्या आवडत्या लेखिका आहेत आणि सध्या ‘जेरॉनिमो स्टिल्टन‘ च्या पुस्तकांनीही पछाडलेय त्याला. राजीव तांबेचे ‘प्रेमळ भूत‘ हे ह्या सुट्टीत भलतेच आवडले त्याला. आवडीचे पुस्तक मिळाले की त्याच्याही डोळ्यात आनंदाची कारंजी थुई-थुई नाचतात. परवाच एक गंमत झाली, सध्या उन्हाळ्याची सुट्टी चालू आहे आणि हा माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘डॅडू, माझ्यासाठी ह्या सुट्टीत चार पुस्तकं घ्यायची का? आणि मला बर्थडेलाही दोन पुस्तकं हवी, सांगू कुठली हवी?” मला अगदी मनापासून हसायला आलं आणि नकळतच धामणस्कर आठवले (अर्थातच त्यांची क्षमा मागून)….

कविता, गोष्टी आणि पुस्तकांचा जिव्हाळा
यापुढेही घरात असणार आहे,
ही केवढी महत्त्वाची गोष्ट!

Featured Image: This beautiful book-tree sketch is by Avanti Kulkarni.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.