या वर्षीच्या अनुभवच्या दिवाळी अंकात काही सुरेख उदाहरणे सापडली अवलिया कलावंताची – काही साहित्यिक काफ्का, चित्रकार वॅन गॉग, गायक उस्ताद अमीर ख़ाँ सारखी परीचित, तर काही फोटोग्राफर विवियन मेयरसारखी अज्ञात. वॅन गॉगचे एकही चित्र त्याच्या हयातीत विकलं गेलं नाही तर काफ्काच्या फक्त दोनच कथा त्याच्या हयातीत प्रसिध्द झाल्या होत्या. पण हे दोघंही त्यांच्या कामाशी पुर्ण एकरूप झाले होते – खरं तर ध्यासच घेतला होता त्यांनी तो आयुष्यभर! विवियन मेयर ह्याच पंथातील – असामान्य फोटोग्राफर पण आयुष्यभर एक सामान्य दाई होऊन काम करत राहिली. तिच्या मृत्युनंतर तिची छायाचित्र जगापुढे आली. नितीन दादरवाला ह्यांनी हा फार छान लेख लिहिला आहे ह्या अपरिचित फोटोग्राफरवर, नक्की वाचा.

उस्ताद अमीर ख़ाँ असेच संगीत हाच प्राण असलेले आणि त्यातच देहभान हरपून गेलेले कलावंत. ‘गुणगुणसेन’ ह्या लेखात अनिल अवचटांनी त्यांच्या अशाच काही आठवणी सांगितल्या आहेत – एकदा सरोदवादक अमजद अलींबरोबर प्रेक्षागृहात मध्यरात्र होईपर्यंत दंग होऊन एकटेच गात होते, कोणीही प्रेक्षक नसल्याचे त्यांच्या लक्षातही आले नाही. हे ते दोन किस्से –


Mihály Csíkszentmihályi ह्यांची फ्लो (Flow) ही संकल्पना आता बहुतेक सर्वांनाच माहिती आहे, मीही My Zen Path इथे Flow विषयी लिहिले होते. पण वर उल्लेखलेले कलंदर कलावंत मला Flow च्याही पलीकडे वाटतात. त्यांचे संपुर्ण अस्तित्वच त्यांनी निवडलेल्या आणि समृध्द केलेल्या क्षेत्रांपेक्षा वेगळे काढताच येणार नाही असे वाटते. ह्या लोकांचे सगळे अस्तित्वच हे जणू existence in flow असावे, हेवा वाटावा असे. Blessed souls indeed! विवियन मेयर मात्र एका अर्थाने वेगळी होती – संपुर्ण आयुष्य दाई म्हणून व्यतीत केलेली ही कलंदर फोटोग्राफर. कित्येक वेळा निगेटीव्ह डेव्हलप करायलाच तिच्याकडे पैसे नसायचे, शेवटी तर निगेटीव्हच्या बॉक्स ठेवण्याचे भाडे द्यायलाही पैसे नसल्यामुळे तेही लिलाव झाले (हे सगळे डिजीटल फोटॉग्राफीच्या आधीचे आहे). ती स्वत: जिवंत असतांना तिच्या फोटोला कसलाही लौकीक मिळाला नाही. तरीही ही कित्येक हजारो फोटो काढत राहीली आणि प्राणपणाने तिने ते सांभाळून ठेवले. वॅन गॉगची चित्र किंवा हिचे फोटो – बहुतेक श्वासाइतकेच आवश्यक होते त्यांच्यासाठी. कुठून येत असतील ह्या उर्मी? कुठून मिळत असेल ह्यांना समाधान? सगळ्या ऐहिक विवंचना विसरून कसे हरपते असे देहभान?
असो. अनुभव २०१८ दिवाळी अंक सुरेखच झालाय, नक्की वाचून संग्रही ठेवावा असा. शेवटी उस्ताद अमीर ख़ाँच्या गाण्याविषयी, भीमसेन जोशींच्या उधृतासकट –

One thought on “कसे हरपते असे देहभान?”