त्याचं दु:ख…


* १ *

संसदेला, संविधानाला नमस्कार करतात
कायद्यांसाठी मात्र चोरवाटाच वापरतात
तेंव्हा लोकशाहीची जी पायमल्ली होते,
त्याचं दु:ख…

खूनी, दंगलखोर मंत्री होतात
आपापल्या केसेस बंदच करतात
तेंव्हा कायद्याची जी चेष्टा होते,
त्याचं दु:ख…

कायद्याच्या पकडीतून नेते सुटतात
समर्थनार्थ नंदीबैल उभे करतात
खुद्द गुन्हगेारच जेंव्हा कायदे बदलतात,
त्याचं दु:ख…

राजकारणात सध्या असेच चालते
साधन शुचितेची अपेक्षा नसते
पण कपटालाच चाणक्यनीती मानले जाते,
त्याचं दु:ख…

सहभागाविना चर्चा, निर्णय होतात
तुघलकी पध्दतीने जाहीर करतात
तेंव्हा विश्वासावर जो घाव होतो,
त्याचं दु:ख…

कपटी नेते कारस्थानं करतात
निषेधाचे प्रयत्न मोडून काढतात
तेंव्हा जाणकार चक्क मूक होतात,
त्याचं दु:ख…

आपल्या, त्यांच्यात विभागण्या होतात
भडकावलेल्या झुंडी हिंसा करतात
आपुलकीचे हात जे त्यात हरवतात,
त्याचं दु:ख…

* २ *

हातातले हात सुटत जातात
बोलणे खुंटते, गैरसमज होतात
कालचे आप्त आज परके होतात,
त्याचं दु:ख…

न बोलवल्याची कारणं सांगतात
तेंव्हा मित्र नजर चुकवतात
पाणावलेले डोळे त्यांना दिसत नाही,
त्याचं दु:ख…

डोळ्यातले पाणी निग्रहाने थोपवतो
पाठीवरचा वार काळजापार जातो
मग मनातला कडवटपणा जिभेवर येतो,
त्याचं दु:ख…

निर्हेतुक गप्पा आठवणीतच उरतात
फायदे मोजूनच परिचय वाढतात
परिचितांच्या गर्दीत जे मैत्र हरवते,
त्याचं दु:ख…

सुमारांचे कळप वरचढ ठरतात
चाकोरीबाहेरील मनांची टवाळी करतात
निराळे विचार जे हद्दपारच होतात,
त्याचं दु:ख…

एकट्या जिवाची काहिली होते
एकेक सावली हिरावली जाते
नजर जी मृगजळात वाट शोधते,
त्याचं दु:ख…

वाट पायाखालची सरत नाही
प्रवासात विसावा मिळत नाही
आणि सोबतीला हात सापडत नाही,
त्याचं दु:ख…

* ३ *

अवचितच हातात हात गुंफतात
उमेदीने जिव्हाळ्याची नाती विणतात
कालांतराने प्रेम संपते, नाती उरतात,
त्याचं दु:ख…

मनातल्या इच्छांना मुरड घालतो
स्वतःलाही विसरुन साथ देतो
तरीही बेभान, बेछूट आरोप होतात,
त्याचं दु:ख…

जुळलेली मनं दुभंगू लागतात
नुसतेच देह जवळ येतात
मग रेशमाचे बंध काचू लागतात,
त्याचं दु:ख…

मनातल्या इच्छा मनातच राहतात
गंधाळलेल्या रात्री विस्मृतीत जातात,
एकाकी क्षण असे उरावर बसतात,
त्याचं दु:ख…

गात्रे शिणतात, वय वाढते,
रुप उणावते, कूसही आक्रसते
पण कुशीचं लेणं जेंव्हा दुरावते,
त्याचं दु:ख…

वासांसि जीर्णानी आता समजते
शिशिरातही पानगळ होतच असते
पण कोवळी पालवी गळून पडते,
त्याचं दु:ख…

रक्ताची नाती डोळ्याआड जातात
तनामनाचे जोडीदार वेगळे होतात
संवादाविना हे मन आक्रंदतच रहाते,
त्याचं दु:ख…

* ४ *

सांगायला मनात बरंच असते
पण ऐकायला कोणीच नसते
मग पोरकी व्यथा उशी भिजवते,
त्याचं दु:ख…

मनडोहात डोकवायला भीती वाटते
आरशातली प्रतिमा अनोळखी होते
गुढ अस्तित्वाचे जे गुरफटत राहते,
त्याचं दु:ख…

मनात अस्वस्थता घोंघावत राहते
व्यक्त होण्याशिवाय गत्यंतरच नसते
लेखणीची सीमा जी वेसण घालते,
त्याचं दु:ख…

तीन आवर्तात दु:ख भिरभिरते
अस्तित्व व्यापून दशांगुळे उरते
वेदना जेंव्हा कंठाला सूर मागते,
त्याचं दु:ख….

सूर मनासारखा लागत नाही
तारा तंबोर्‍याच्या जुळत नाही
मैफिल काही केल्या रंगतच नाही,
त्याचं दु:ख…

नकळतच एक जाण झंकारते
आपलेच काहीतरी खोलवर बिनसते
व्यथा मनातली जी भवतालात झिरपते,
त्याचं दु:ख…

महाकवी दु:खाचा हलकेच हसतो 1
साहिरच्या काव्यातला अर्थ उमगतो 2
लख्ख जाणीवेचा क्षण डोळे ओलावतो,
त्याचं सुख.

~ मनिष (16/8/2019)
© Manish Hatwalne


  1. कवी ग्रेस उर्फ माणिक गोडघाटे
  2. साहिर लुधियानवी – कभी खुदपे कभी हालात पे

Featured Image gratitude: Pixabay


I have written this poem in bits and pieces for more than a year. New stanzas came spontaneously and I noted them down in my notebooks. Finally wrote a large chunk of it around 16th August and completed it.

There are spirals here – it starts with sociopolitical pain/anger and moves on to interpersonal sphere, then moves to intimate sphere and finally delves in intra-personal realm. While moving from outer spirals, “hands” move the baton, whereas while moving from intimate to intra-personal, it is the mind.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.