लॉकडाऊन…

तर मित्रों, आलाय शनिवार-रविवार
फक्त essentials ची दुकानं उघडणार
मॅक्डोनाल्ड्स, डॉमिनोज् पण उघडे राहणार
WfH वाले मस्त बर्गर-पिझ्झा खाणार

हार्डवेअरची टपरी मात्र बंद राहणार
खोलीतला नळ दुरुस्त नाय होणार
आपल्यासाठी essential काय,
हे मात्र तो सायेब ठरवणार.


आपले रोजगार हिरावले जाणार
कित्येकांचे शटर डाऊन होणार
रोजच्या खाण्याचेही वांदे होणार
काही अभागी मरण कवटाळणार

त्यांची संपत्ती, गुर्मी वाढत राहणार
आपला संयम, पैसा संपत जाणार
पण economy ला प्रॉब्लेम नाय,
हे मात्र तो सायेब ठरवणार.

आपले आप्त आपण गमावणार
चितेमागून चिता जळत राहणार
पण fatality rate फार नाय,
हे मात्र तो सायेब ठरवणार.

कुठवर हे सारे सहन करणार?
मुके-बिचारे बनून हाकले जाणार?
प्रेताच्या टाळुवरचं लोणी खातात,
त्यांना धडा कधी शिकवणार?

~ © मनिष/Manish (3/7/21 – 16/7/21)


Revised some of the lines, and added the images that I’ve been noticing during the lockdown. The images that impelled me to write this. The cynicism and harsh words are indicative of the deep disturbance…. 😦


Featured image: From India.com, using here with gratitude. Other images are mostly clicked by me, or taken from twitter where the original photographer is unknown.

क्या उखाड़ लिया?

वेळ मिळालाच आहे अनायसे, तर संपवूया
कितीतरी वाचायची राहिलेली पुस्तकं,
अर्धवट लिहिलेल्या कविता, काही लेख.
असंच खूप काही, मनापासून ठरवलं.
धावपळीत रोजच्या, बरंच राहून गेलं.
डायरीच्या पानांनी मग हक्काने खडसावलं,
क्या उखाड़ लिया?

अपूरी स्वप्नं दूरुनच खुणावत राहिली
दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली
वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली
झाडांची पानं गळून गेली,
धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली.
निष्पर्ण पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला,
क्या उखाड़ लिया?

ज्यांच्या अंगा-खांद्यांवर खेळलो,
त्यांनाच खांदा देऊन आलो.
सरणावर थोडा, मीही जळून गेलो.
पोरकेपण नि पोक्तपण सोबत राहिले.
नकळत अशीच कित्येक वर्षं सरली.
थोडीफार उरलेली वर्षं आता खिजवतात,
क्या उखाड़ लिया?

क्या उखाड़ लिया?


स्पर्धेतली कविता© Manish Hatwalne.

Feature Image by Jan Bieler from Pixabay

 

त्याचं दु:ख…

* १ *

संसदेला, संविधानाला नमस्कार करतात
कायद्यांसाठी मात्र चोरवाटाच वापरतात
तेंव्हा लोकशाहीची जी पायमल्ली होते,
त्याचं दु:ख…

खूनी, दंगलखोर मंत्री होतात
आपापल्या केसेस बंदच करतात
तेंव्हा कायद्याची जी चेष्टा होते,
त्याचं दु:ख…

कायद्याच्या पकडीतून नेते सुटतात
समर्थनार्थ नंदीबैल उभे करतात
खुद्द गुन्हगेारच जेंव्हा कायदे बदलतात,
त्याचं दु:ख…

राजकारणात सध्या असेच चालते
साधन शुचितेची अपेक्षा नसते
पण कपटालाच चाणक्यनीती मानले जाते,
त्याचं दु:ख…

सहभागाविना चर्चा, निर्णय होतात
तुघलकी पध्दतीने जाहीर करतात
तेंव्हा विश्वासावर जो घाव होतो,
त्याचं दु:ख…

कपटी नेते कारस्थानं करतात
निषेधाचे प्रयत्न मोडून काढतात
तेंव्हा जाणकार चक्क मूक होतात,
त्याचं दु:ख…

आपल्या, त्यांच्यात विभागण्या होतात
भडकावलेल्या झुंडी हिंसा करतात
आपुलकीचे हात जे त्यात हरवतात,
त्याचं दु:ख…

* २ *

हातातले हात सुटत जातात
बोलणे खुंटते, गैरसमज होतात
कालचे आप्त आज परके होतात,
त्याचं दु:ख…

न बोलवल्याची कारणं सांगतात
तेंव्हा मित्र नजर चुकवतात
पाणावलेले डोळे त्यांना दिसत नाही,
त्याचं दु:ख…

डोळ्यातले पाणी निग्रहाने थोपवतो
पाठीवरचा वार काळजापार जातो
मग मनातला कडवटपणा जिभेवर येतो,
त्याचं दु:ख…

निर्हेतुक गप्पा आठवणीतच उरतात
फायदे मोजूनच परिचय वाढतात
परिचितांच्या गर्दीत जे मैत्र हरवते,
त्याचं दु:ख…

सुमारांचे कळप वरचढ ठरतात
चाकोरीबाहेरील मनांची टवाळी करतात
निराळे विचार जे हद्दपारच होतात,
त्याचं दु:ख…

एकट्या जिवाची काहिली होते
एकेक सावली हिरावली जाते
नजर जी मृगजळात वाट शोधते,
त्याचं दु:ख…

वाट पायाखालची सरत नाही
प्रवासात विसावा मिळत नाही
आणि सोबतीला हात सापडत नाही,
त्याचं दु:ख…

* ३ *

अवचितच हातात हात गुंफतात
उमेदीने जिव्हाळ्याची नाती विणतात
कालांतराने प्रेम संपते, नाती उरतात,
त्याचं दु:ख…

मनातल्या इच्छांना मुरड घालतो
स्वतःलाही विसरुन साथ देतो
तरीही बेभान, बेछूट आरोप होतात,
त्याचं दु:ख…

जुळलेली मनं दुभंगू लागतात
नुसतेच देह जवळ येतात
मग रेशमाचे बंध काचू लागतात,
त्याचं दु:ख…

मनातल्या इच्छा मनातच राहतात
गंधाळलेल्या रात्री विस्मृतीत जातात,
एकाकी क्षण असे उरावर बसतात,
त्याचं दु:ख…

गात्रे शिणतात, वय वाढते,
रुप उणावते, कूसही आक्रसते
पण कुशीचं लेणं जेंव्हा दुरावते,
त्याचं दु:ख…

वासांसि जीर्णानी आता समजते
शिशिरातही पानगळ होतच असते
पण कोवळी पालवी गळून पडते,
त्याचं दु:ख…

रक्ताची नाती डोळ्याआड जातात
तनामनाचे जोडीदार वेगळे होतात
संवादाविना हे मन आक्रंदतच रहाते,
त्याचं दु:ख…

* ४ *

सांगायला मनात बरंच असते
पण ऐकायला कोणीच नसते
मग पोरकी व्यथा उशी भिजवते,
त्याचं दु:ख…

मनडोहात डोकवायला भीती वाटते
आरशातली प्रतिमा अनोळखी होते
गुढ अस्तित्वाचे जे गुरफटत राहते,
त्याचं दु:ख…

मनात अस्वस्थता घोंघावत राहते
व्यक्त होण्याशिवाय गत्यंतरच नसते
लेखणीची सीमा जी वेसण घालते,
त्याचं दु:ख…

तीन आवर्तात दु:ख भिरभिरते
अस्तित्व व्यापून दशांगुळे उरते
वेदना जेंव्हा कंठाला सूर मागते,
त्याचं दु:ख….

सूर मनासारखा लागत नाही
तारा तंबोर्‍याच्या जुळत नाही
मैफिल काही केल्या रंगतच नाही,
त्याचं दु:ख…

नकळतच एक जाण झंकारते
आपलेच काहीतरी खोलवर बिनसते
व्यथा मनातली जी भवतालात झिरपते,
त्याचं दु:ख…

महाकवी दु:खाचा हलकेच हसतो 1
साहिरच्या काव्यातला अर्थ उमगतो 2
लख्ख जाणीवेचा क्षण डोळे ओलावतो,
त्याचं सुख.

~ मनिष (16/8/2019)
© Manish Hatwalne


  1. कवी ग्रेस उर्फ माणिक गोडघाटे
  2. साहिर लुधियानवी – कभी खुदपे कभी हालात पे

Featured Image gratitude: Pixabay


I have written this poem in bits and pieces for more than a year. New stanzas came spontaneously and I noted them down in my notebooks. Finally wrote a large chunk of it around 16th August and completed it.

There are spirals here – it starts with sociopolitical pain/anger and moves on to interpersonal sphere, then moves to intimate sphere and finally delves in intra-personal realm. While moving from outer spirals, “hands” move the baton, whereas while moving from intimate to intra-personal, it is the mind.