अचंब्याच्या गोष्टी

achambyachya-goshti

‘अचंब्याच्या गोष्टी’ ह्या एका विचित्र वयातल्या संधिप्रकाशाच्या गोष्टी. विचारपुर्वक निवडलेले खरोखरीचे eclectic collection. काही ओळखीचे तर काही (माझ्यासाठी) अनोळखी लेखक. ११-१२ वर्षाचे वय म्हणजे न धड बालपण न धड पौगंडावस्था…ह्या अशा अडनिड्या वयाच्या अलवार गोष्टी. ह्या वयात धड समज आलेली नसते, स्त्री-पुरुष संबंध, मोठ्यांचे सुप्त राग-लोभ, तिरके व्यवहार ह्याची नीटशी जाणीव झालेली नसते, पण बालपणीचा भाबडेपणा संपत आलेला असतो. जगाची, नात्यांची आणि माणसांच्या वागण्याची संगत ही मुले आपापल्या अनुभवांनुसार आणि आकलनाप्रमाणे लावायचा प्रयत्न करत राहतात. त्याच वयातल्या मुला-मुलींच्या अनुभवातून, परीप्रेक्ष्यातून लिहिलेल्या ह्या गोष्टी. कधी-कधी लेखकांच्या वयाचा अनुभव, समज ह्या गोष्टींत डोकावते (संपादकांच्या भाषेत, ‘जाणीवपुर्वक बांधलेला हात सुटतो’), पण बहुतांशी त्या मुलांच्या भावविश्वात आणि त्यांच्या आकलनाच्या कक्षेतच घडतात, पण तरीही त्या कथांच्या मधल्या जागा खूप काही सांगून जातात.

बोकिलांची ‘पतंग’ आणी जातेगावकरांची ‘भातुकली’ ह्या दोन्ही माझ्यासाठी नवीन आणि भन्नाट (सगळ्या नाही वाचल्यात अजून!). शिवाय सुबोध जावडेकरांची नेमकी, जाणती प्रस्तावना ही खास ‘चेरी ऑन टॉप’. तसंच खानोलकरांच्या ‘सनई’ कथेतील उधॄत मलपृष्ठावर पुस्तकाचे अंतरंग नेमके उलगडून जाते. काल सहजच हाती लागले आणि मग दिड-दोन तास वाचतच बसलो.

पुस्तकप्रेमींने हे पुस्तक वाचावेच पण मुलांबरोबर काम करणार्‍यांनी तर हे पुस्तक चुकवूच नये. नक्की वाचा.

achambyachya-goshti-back

Advertisements

अपनी कहानी छोड़ जा

खूप लिहिता येईल हया गाण्याविषयी. सलीलदांचे music, लता-मन्नादा यांचा आवाज आणि अर्थातच शैलेंद्र.

मला आत्ता आज, या क्षणाला सगळ्यात भावतात आहे ते (नेहमीप्रमाणेच) इतक्या सहजपणे साध्या शब्दात तत्वज्ञान मांडणारे शैलेंद्रचे शब्द. अगदी रुपकात्मक वाटावे असे गाणे (मी चित्रपट पाहिला नाही, त्यामुळे त्या संदर्भात काही बोलू शकत नाही) आणि तो कोरस अगदी घुसतो मनात.

थोरल्या बर्मनदा सारखाच नायकाच्या तोंडी नसलेल्या बॅकग्राउंडच्या, तात्त्विक गाण्यात मन्नादांचा आवाज खुलतो, ते नायकांचेही गाणे छान गातात पण अशा गाण्यात त्यांचा आवाज अगदीच surreal वाटतो.

Perpetuating beyond existence ही मला मनुष्याच्या अगदी मुलभूत प्रेरणांपैकी एक वाटते. अर्थातच procreation च्या पलीकडे स्वतःच्या कामाच्या स्वरूपात आपले अस्तित्व उरावे अशी काहिशी ती मला वाटते; ‘अपनी कहानी छोड़ जा, कुछ तो निशानी छोड़ जा’ हे असेच काहिसे. साधे-सोपे पण तितकेच profound, आणि ‘मौसम’ हा किती सूचक metaphor… शैलेंद्रशिवाय कोण असे लिहिणार? गाण्यांत सहजपणे कवित्व जपणारे आणि चिंतन गुंफणारे जे थोडेफार गीतकार आहे, त्यात शैलेंद्रचे नाव वगळताच येणार नाही. सलीलदांनी ह्या ओळी कोरसमध्ये अशा काही रचल्या आहेत की समुद्रावर राहतांना त्याच्या गंभीर गाजेसारख्याच मनात घुमतात. तशाच हुरहूरही लावतात.

सकाळी कुठेतरी ऐकले हे गाणे आणि तो resonance कानात, मनात अजूनही थरथरतोय….

अपनी कहानी छोड़ जा, कुछ तो निशानी छोड़ जा
कौन कहे इस ओर तू फिर आये न आये
मौसम बीता जाय, मौसम बीता जाय….

If we won’t tell our stories, who will?