InShort 5 – Printed Rainbow

भारतीय अ‍ॅनिमेशन मुळातच फार प्रचलित नाही, त्यातही अ‍ॅनिमेशन बनवलेच तर ते मुलांसाठीच असते असा साधारणपणे आपल्याकडे समज आहे. त्यात प्रौढांसाठी अ‍ॅनिमेशन बनवणे, तेही २००६ च्या सुमारास किती अवघड असेल ह्याची कल्पना आपण करू शकतो. ‘प्रिंटेड रेनबो’ ही अशीच एक मोठ्यांसाठी बनवलेली, अगदी चुकवू नये अशी तरल अ‍ॅनिमेशन फिल्म आहे.

Printed Rainbow/प्रिंटेड रेनबो (Silent/2006 ~ १५ मिनिटे) ह्या गीतांजली राव ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या शॉर्ट-फिल्मने २००६ मधे कॅन्स येथील महोत्सवात ३ पारितोषिके मिळवली आहे, त्यात सर्वोत्तम शॉर्ट-फिल्मचे पारितोषिकही आहे. त्याशिवाय विविध २२ पारितोषिके ह्या शॉर्ट-फिल्मने मिळवली आहेत. गीतांजली राव ह्यांनी पडद्यावर कलाकार म्हणून अभिनयही केला आहे. मला स्मरणात राहिलेली त्यांची भुमिका म्हणजे २०१८ च्या ‘ऑक्टोबर’ ह्या चित्रपटातील शिऊलीच्या आईची, प्रो. विद्या ऐय्यर ह्यांची. शॉर्ट-फिल्म प्रिंटेड रेनबोचे दिग्दर्शन, निर्मिती अणि महत्वाचे म्हणजे सगळ्या फिल्मचे अ‍ॅनिमेशन त्यांनीच केले आहे, तेंव्हा ह्या सगळ्या पारितोषिकांचे श्रेय त्यांचेच आहे.

प्रिंटेड रेनबो ही गोष्ट आहे एका वयस्कर, एकट्या आजींची आणि त्यांच्या मांजरीची. मुंबईसारख्या महानगरातील काँक्रिटच्या जंगलात दाटीवाटीने राहूनही एकटे पडणार्‍या माणसांची, काळ्या-करड्या आयुष्यातल्या विरंगुळ्याची, छंदांची आणि त्यांच्या उबदार नात्यांची. अशाच एका इमारतीतल्या एका फ्लॅटमधे आपल्या मांजरीबरोबर एकट्या रहाणार्‍या ह्या वयस्कर आजी रोजच्या, एकसुरी रुटीनमधे सरकत आहेत. रोज चहा घेऊन मांजरीला खायला देऊन मग साफ-सफाई, थोडी भांडी, कपड्यांच्या घड्या घालून बाल्कनीतून बसून राहतात. ह्यात एका सीनमधे ह्या आजी दुसर्‍या घरांतल्या बाल्कनीत, खिडकीत बघत असतात, कोणी झाडाला पाणी देतंय, कोणी शिवण करतंय, बहिण-भाऊ खेळतायत, एक व्हीलचेअरवरचा मुलगा चिमणीशी खेळतोय आणि असंच काहितरी. असाच एक सीन ‘लंचबॉक्स’ मधे आहे – इरफान सिगारेट ओढत आपल्या बाल्कनीतून समोरच्या घरातल्या जेवणार्‍या कुटंबाकडे असुयेने बघत असतो.त्याच्या खिन्न डोळ्यात जाणवणारा एकाकीपणा अंगावर काटा आणतो. तसाच काहिसा परिणाम राव ह्यांनी ह्या सीनमधे आणला आहे – इथे त्या आजी फ्रेममधे नसूनही त्यांचा एकटेपणा प्रभावीपणे जाणवून जातो.

गीतांजली राव ह्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् च्या विद्यार्थीनी. त्यांची रंगांची, टेक्शरची आणि त्यांच्या संयोजनाची समज त्यांच्या प्रिंटेड रेनबो ह्या सुरुवातीच्या शॉर्ट-फिल्ममधेही जाणवते. ह्या आजी गोल-गोल आहेत, फारसे फिचर्स असे दाखवलेच नाहीत. तरीही त्यांच्या चष्म्याआड लुकलुकणार्‍या डोळ्यातला प्रेमळ, समजुतदार अनुभव जाणवतो. तसेच त्यांच्यासारखेच कुत्र्याबरोबर एकटे रहाणार्‍या आजोबांची आपुलकीही जाणवते. धुसर, करड्या फ्रेममधेही त्यांच्या दोघांच्या देहबोलीतून तो जिव्हाळा फ्रेम्स उबदार करतो. काळ्या-करड्या सीनमधले धूसर, दाणेदार टेक्शर, रंगीत फ्रेममधली रंगाची उधळण आणि संगती, त्यांचा एकत्रित होणारा परिणाम हे अतिशय विचारपुर्वक आणि सुरेखपणे घडवले आहे. शांतपणे बसून सर्जनशील राव यांनी मेहनतीने चितारलेली प्रिंटेड रेनबोची एकेक फ्रेम बघतांना भरून येते.

तर ह्या एकट्या आजींचा आवडता छंद आहे तो त्यांनी जमवलेल्या काड्यापेट्या बघणे. ह्या विरंगुळ्यात त्या अगदी रमून जातात. त्या काड्यापेट्यांवरची वेगवेगळी, रंगीबेरंगी चित्रे पाहतांना त्या मनाने त्याच कल्पनेच्या दुनियेत प्रवेश करतात. प्रवेश करतात म्हणजे अक्षरशः तिथेच जातात, आणि त्यांच्याबरोबर आपणही एखाद्या लहान मुलासारखे तिथे जातो. राव ह्यांनी काड्यापेट्यांवरील चित्रांनी एक आगळे-वेगळे विश्व उभारले आहे. मी साधारण ७-८ वर्षांपुर्वी ही शॉर्ट-फिल्म पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर पाहिली होती. तेंव्हापासूनच मी ह्या फॅन्टसीवर बेहद फिदा आहे. गीतांजली राव ह्यांनी ही कल्पना फार प्रेमाने, निगुतीने फिल्ममधे चितारली आहे. आजींच्या ह्या कल्पनेच्या राज्यात हत्ती आहेत, अलिशान महाल आहेत, स्वर्गीय संगीत आहे आणि ह्या सगळ्यांचा आस्वाद घेणार्‍या स्त्रिया आहेत. त्यातले काही सीन बघुन तर डॉ. उज्ज्वला दळवी ह्यांनी ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ मधे लिहिलेल्या स्त्रियांच्या परीकथेतील रात्रीची आठवण झाली. आपल्या ह्या आजीही निखळ आनंदाने त्या सर्व मौजमजेत सामिल होतात, अगदी शांत, सुरेल रात्रीच्या नदीच्या पाण्यात दीपदानही पाहतात. संगीत म्हणाल तर दस्तुरखुद्द बेग़म अख़्तर यांची ‘न जा बलम परदेस’ ही मिश्र खमाज़मधली ठुमरी आहे, ठुमरीचे थोडेसेच सूर अशी काही हुरहूर लावून जातात की विचारू नका.

आजींच्या ह्या विरंगुळ्यात सामील आहेत ते समोरच रहाणारे, त्यांच्यासारखेच आपल्या कुत्र्याच्या सोबतीने एकटे राहणारे वयोवृध्द आजोबा. ते आजोबाही हौसेने आजींना काड्यापेट्या आणून देतात. त्या दोघांचा एकटेपणा वेगवेगळा आहे तसाच एकत्रही आहे. आजी निवांत वेळी बाकी काड्यापेट्या बाजूला ठेवून, आजोबांनी आवर्जून आणलेली काड्यापेटी निरखत आरामखुर्चीत डोलत-डोलत आपल्या कल्पनेच्या रंगीत, आनंदी विश्वात हरवून जातात. ह्या आनंदी, काल्पनिक अनुभवांसाठी वापरलेल्या सुरावटीही सुरेल आणि प्रसंगाला साजेशा आहेत. ट्रक चालवतांना भुरुभुरू उडणारे त्यांचे केस, आनंदाने लुकलुकणारे डोळे, पाण्यातून मासा काढून मांजरीला देतांना, फुलांच्या झाडांवर झोका घेतांना आणि त्यांच्या त्या हिरव्यागार बागेत रममाण होतांना अगदी एखाद्या निरागस लहान मुलीसारख्या सुखी दिसतात.

सद्यकालीन माणसांच्या नात्यांत येणारा दुरावा, त्यांना वाटणारा एकाकीपणा हा धागा कित्येक चित्रपटांत पहायला मिळतो – अगदी भारतातील रुचिका ओबेरॉयच्या ‘आयलंड सिटी‘ पासून अगदी बेहताश सनीहा (Behtash Sanaeeha) ह्यांच्या इराणी ‘Risk Of Acid Rain‘ ह्या चित्रपटांमधे हा माणसांचा एकाकीपणा, आणि मैत्रीची, नात्यांची सार्वत्रिक गरज फार संवेदनशीलपणे दाखवली आहे. गीतांजली राव प्रिंटेड रेनबो ह्या शॉर्ट-फिल्ममधे अशा एकाकीपणाकडे सहानुभुतीने बघतात, पण एकटेपणा म्हणजे फक्त एकाकीपणा आणि दु:ख असे ठोकळेबाज समीकरण मांडत नाही. एकट्या आजी आपल्या आयुष्यात आणि कल्पनाविश्वात तशा मजेत असतात. सोबतीला प्रेमळ, लठ्ठ मांजर आणि सुहृद आजोबांच्या रुपाने एक उबदार मानवी नातेही जपतात. या सगळ्याच पात्रांबद्दल आपल्याला आपुलकी वाटते. त्यामुळेच असेल कदाचित, पण ह्या शॉर्ट-फिल्मविषयी लिहितांना ‘ती वृध्द स्त्री’ किंवा ‘ते वयोवृध्द गृहस्थ’ असे तिर्‍हाईतासारखे नाही लिहिता येत, आपल्या परिचयातले आजी, आजोबा हेच त्यांच्यासाठी श्रेयस्कर वाटते. ही शॉर्ट-फिल्म थोडीफार त्यांच्या आईवर आणि तिच्या मांजरीवर आधारीत आहे असे गीतांजली राव एका इंटरव्ह्यूमधे म्हणाल्या आहेत. त्यांची ही आत्मियता ह्या फिल्ममधे, त्या आजीच्या पात्रामधे जाणवल्यावाचून राहत नाही.

शेवटी हिरव्यागार बागेत, झाडांमधे, प्राण्यांमधे बागडणार्‍या आनंदी आजी एक पूल ओलांडतात. एका दोरीवर त्यांची आणि मांजरीची वस्त्रं वाळत असतात. ‘वासांसि जीर्णानि …’ डोळ्यांसमोर उलगडते आणि काडेपेटीच्या जगातल्या एका छोट्याशा घरात आरामखुर्चीवर बसून, आरामात डुलत आजी समाधानाने बाय-बाय करतात.


Reference: Geetanjali Rao Interview

InShort 4 – घड्याळांचा दवाखाना

वडील आणि मुलाचे नाते हा एक जिव्हाळ्याचा पण तितकाच अवघड प्रश्न आहे. खास करून मुलगा ‘टीनेजर’ असेल तर. घड्याळांचा दवाखाना/The Watch Clinic ही अशीच एक कथा आहे वयात येणार्‍या मुलाची, त्याला भुरळ पाडणार्‍या रंगीबेरंगी जगाची आणि जगराहाटी सांभाळणार्‍या त्याच्या बापाची. १०-११ मिनिटांच्या छोट्या फिल्ममध्ये वडील-मुलाचे नाते, त्यांची समांतर विश्वे आणि मुलाची उमज हे सहज आणि सुंदरपणे येते.

घड्याळांचा दवाखाना (मराठी/2009) ह्या शॉर्ट-फिल्मविषयी IMDB वर माहिती मिळाली नाही. दिग्दर्शक विक्रांत पवार ह्यांच्या स्वतःच्या IMDB पेज वरही त्याविषयी माहिती उपलब्ध नाही, पण शॉर्ट-फिल्ममधल्या उल्लेखावरून ती विक्रांत पवार यांची FTII (फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया) येथे द्वितीय वर्षाला शिकत असतांनाची शॉर्ट-फिल्म आहे. विक्रांत पवार हे उमेश कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘विहीर’ चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक होते. तसेच Afterglow दिग्दर्शित करणार्‍या कौशल ओझाने घड्याळांचा दवाखानामधे सहाय्यक दिग्दर्शकाची जवाबदारी पार पाडली आहे. घड्याळांचा दवाखाना ही २०१० च्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मधे दाखवली होती आणि इतरही काही सन्मान आणि पुरस्कार ह्या FTII च्या विद्यार्थ्यांच्या शॉर्ट-फिल्मने मिळवले आहेत. हे सगळेच प्रतिभावंत फिल्ममेकर्स आपापल्या जाणिवांची झलक दाखवतात, स्ट्रगल करत राहतात – एखाद्या गाजलेल्या फिल्ममुळे मग ते लोकांपुढे येतात. विक्रांत पवारांचेही कदाचित असेच होईल. असो.

घड्याळांचा दवाखाना ही कथा आहे सदुभाऊ (दिलीप जोगळेकर) आणि त्यांच्या टीनेजर मुलाची – संजूची (आलोक राजवाडे). सदुभाऊंचे कोल्हापूरच्या फडके हौदाजवळ एक घड्याळ दुरुस्तीचे दुकान आहे, त्याला ते ‘घड्याळांचा दवाखाना’ म्हणतात आणि तशाच निगुतीने घड्याळांची काळजीही घेतात. कॉलेजच्या वयाच्या संजूला मित्र-मैत्रिणींबरोबर मौजमजेची आवड आहे, आणि त्यासाठी लागणारे पैसे वडीलांकडून काय थाप मारून मिळवावे ह्याच्यासाठी मित्राबरोबर विचार करतोय. बाप व्यवहाराला पक्का असल्यामुळे अशी-तशी थाप पचणार नाही याचे भान त्याला आहे. सदुभाऊ सचोटीने दुकान चालवतात, आजुबाजूच्या लोकाविषयी त्यांना आस्था आहे, लोकांच्या अडीअडचणीला मदत करायचा चांगुलपणा त्यांच्याकडे आहे. इतर दुकानदारांमधेही त्यांना मान आहे, त्यांच्या शब्दाला वजन आहे. असा हा बाप, इतर कशाला नाही तर नेमके कशाला पैसे काढेल याचा अचूक अंदाज संजूला आहे. असाच एक फर्मास प्लॅन बनवून तो दुकानात येतो.

शॉर्ट-फिल्मची कथा दिग्दर्शक विक्रांत पवार यांचीच आहे, पटकथा त्यांनी राधिका मूर्तींबरोबर लिहिली आहे. विशेष म्हणजे, ही शॉर्ट-फिल्म पूर्णपणे स्टुडीओत चित्रित केली आहे. तरीही घड्याळ दुरुस्तीचे दुकान अतिशय हुबेहुब साकारले आहे. तिथला पसारा, तिथली आयुधे, साधने, त्यांचा दिलीप जोगळेकर यांनी केलेला सराईत वापर ह्या सगळ्यांनी अगदी नेमकी वातावरण निर्मिती केली आहे; इतकी की खरंच तिथे काही मिनिटांपुर्वी घड्याळ दुरुस्त होत असेल याची खात्री वाटते. ह्याचे श्रेय आहे कला-दिग्दर्शक आशुतोष कविश्वर आणि सेट डिझायनर लक्ष्मी केळूसकर यांचे. तशीच दखल घ्यावी लागते ह्या शॉर्ट-फिल्ममध्ये वापरलेल्या पॅरॅलल-कट्सची (ज्यात एकाच वेळी दोन वेगवेळ्या ठिकाणी होणार्‍या घटना समांतरपणे दाखवल्या जातात) – ह्या संकलनाच्या तंत्राद्वारे मुलगा आणि वडील यांची समांतर आयुष्ये छान रेखाटली आहेत, संकलन आहे मोनिषा बलदावा यांचे. मुलाचे सायकलीच्या चाकाशी खेळणे आणि वडिलांचे घड्याळाच्या चक्रांमधले काम हे समांतर पाहतांना शब्दांशिवायच त्यांचे जगणे, त्यांचे विश्व मनावर ठसते. आलोक राजवाडे आणि दिलीप जोगळेकर हे दोघेही मुलगा आणि वडिलांच्या भुमिकेत फिट्ट बसतात. दोघांनीही, खास करून आलोकने भुमिका सुरेख निभावलीय. दिग्दर्शक तसेच इतर तंत्रज्ञांनीही विद्यार्थी असतांना आपापल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे.

तर सविस्तर प्लॅन बनवून संजू वडिलांच्या घड्याळ दुरुस्तीच्या दुकानात येतो, सायकलच्या किल्लीशी चाळा करत परगावच्या मित्राच्या अपघाताविषयी वडिलांना सांगून २००० रुपये मागतो. थोडी चौकशी करून वडील, सदूभाऊ दुकानात जमलेले १५०० रुपये देतात, आणि उरलेले ५०० रुपये घरातल्या कपाटातून घ्यायला सांगतात. तेवढ्यात काही कारणाने त्यांना दुकानाबाहेर जावे लागते म्हणून थोडा वेळ संजूला दुकानात थांबायला सांगून ते निघून जातात. शिवाय एक आजोबा त्यांचे दुरुस्तीला टाकलेले घड्याळ घ्यायला येतील, त्यांना ते देऊन त्यांच्याकडून पैसे घे असेही सांगून जातात. ते आजोबा येतात, आणि त्यांच्याशी बोलता-बोलता संजूला पैशाचे मोल जाणवते. अगदी रुपयासाठीही अस्वस्थ होणारे आजोबा, त्यांचा चांगुलपणा तो स्वतः अनुभवतो. बाप पै-पै करून कमवतोय, पैसे जमवतोय हेही त्याला उमगते – हे सगळे अगदी सहजपणे, शब्दबंबाळ लेक्चर न देता दिग्दर्शकानी दाखवलंय. कुठल्याही विशिष्ट रकमेची, मग ते २० रुपये असोत, २००० रुपये असोत की २ लाख, तिची नेमकी किंमत context मधेच समजून घेता येते. वडील दुकानातून घेल्यानंतरच्या थोड्या वेळात संजूला २००० रुपयांची नेमकी किंमत, त्याचं context समजून येते.

शेवटी सायकल घेऊन दुकानातून परतणार्‍या पाठमोर्‍या संजूच्या देहबोलीत त्याची उमज जाणवत राहते. टायटलच्या सुरेल सुरावटीसारखी ती जाणीव कुठेतरी आपल्या मनातही उतरते आणि रुंजी घालत राहते.


Featured Image:  Snapshot from the short-film – The Watch Clinic (घड्याळांचा दवाखाना).

InShort 3 – Juice

Juice (हिंदी/२०१७) ही शॉर्ट-फिल्म बघितल्यानंतर हे वाचले तर जास्त मजा येईल, हवी तर वाचल्यानंतर पुन्हा एकदा पहा. आवर्जून दोनदा पहावी अशी ती नक्कीच आहे.

घरातील पार्टीचा एक छोटासा प्रसंग, त्यात काहिही अतिरंजित न दाखवता, रोजच्या जगण्यातली विषमता, लिंगभेद (gender roles) एखादा कसबी दिग्दर्शक थोड्याशाच वेळात किती प्रभावीपणे दाखवू शकतो ह्याचा एक उत्कृष्ट नमूना म्हणून ‘ज्यूस’ अवश्य बघावी. किंवा एखादी कथा अगदी थोडक्यात, पण अंगावर काटा येईल इतकी भेदकपणे कशी पडद्यावर दाखवता येते ते अनुभवण्यासाठी ‘ज्यूस’ नक्की बघावी. किंवा नुसतीच एक चांगली कथा पडद्यावर पहायची असेल तरीही ‘ज्यूस’ नक्की बघावी.

नीरज घायवान हा आतिशय संवेदनशील दिग्दर्शक आहे, त्याच्या ‘मसान’ (२०१५) ह्या गाजलेल्या चित्रपटाने त्याला कित्येक सन्मान मिळवून दिलेत. सध्या नावजलेल्या सॅक्रेड-गेम्सचेही काही भाग त्याने दिग्दर्शित केले आहेत. तरीही शॉर्ट-फिल्म ह्या माध्यमाची आवड त्याला आहे – त्याने ‘ज्यूस’ ही शॉर्ट-फिल्म मसाननंतर, म्हणजे २०१७ मध्ये दिग्दर्शित केली आहे. जेमतेम १५ मिनिटांपेक्षाही छोटी ही फिल्म एखाद्या पूर्ण लांबीच्या चित्रपटापेक्षाही जास्त प्रभावित करते.

‘ज्यूस’ ही कथा आहे मंजू सिंग (शेफाली शहा) आणि ब्रिजेश सिंग (मनिष चौधरी) ह्यांच्या घरातील. अशाच एका संध्याकाळी काही जवळचे मित्र त्यांच्या परिवारासह पार्टीला आले आहेत. पुरुषांच्या दिवाणखाण्यात ड्रींक्सबरोबर गप्पा चालल्यात, आणि स्त्रीया किचनमधे स्पयंपाक बनवत आहेत, मुलं दुसर्‍या रुममध्ये खेळतायत. पुरूषांच्या गप्पा नवीन स्त्री बॉसवर घसरतात (मंजूला ‘डोन्ट माईंड’ सांगून), त्यात थोडी बंगाली, सन्याल बाबूंच्या उच्चारांची थट्टा होते आणि मग अमेरिकन राजकारणावर, ट्रंपवर घसरतात. स्त्रियांच्या गप्पा गरोदर असणार्‍या रजनीच्या ‘ग्लो’ विषयी आणि मुलांविषयी. स्वयंपाकाची लगबग चालू आहे, कबाब, घुगनी बनतात आहे, बाहेर पुरुषांची सरबराई करण्यासाठी. मुलं व्हिडिओ गेममध्ये मग्न आहेत. मंजू कुलरमध्ये पाणी भरून दिवाणखाण्यात ठेवते, उकाडा फार वाढलाय. किचनमध्ये तर उकाडा खूपच जाणवतोय, पण तिथे पंखा नाही. मंजू स्टुलावर चढून एक जूना टेबलफॅन काढते (तिची धडपड टिपणारा कॅमेराचा टॉप अँगल, आणि त्यातला सूचक अर्थ कुठेतरी नेणीवेत जाणवतो) पण तो थोडा चालू होऊन बंद पडतो. मंजू नवर्‍याला, ब्रिजेशला पंख्याकडे बघायला सांगते, तो ‘आ रहे है’ म्हणतो, पण गप्पांमध्येच रंगून जातो. आता पुरुषांच्या गप्पा आता ‘पेचीस’, अकबरावर घसरल्यात. सरबराई सुरूच आहे.

नीरज घायवान एक वेगळ्या वाटेचा लेखक आणि प्रभावी दिग्दर्शक आहे – त्याच्या कथेत, पटकथेत हे जाणवत रहाते. सहजच रोजचे प्रसंग आणि त्या संदर्भाने संवाद आहेत, पण ते नेमके टोचतात. एखाद्या चांगल्या कथेत जसे ‘reading between the lines’ जाणवते, तसेच ह्या कथेतही अनेक पदर जाणवतात. सामाजिक उतरंडीचे छोटे प्रसंग, मुलांवर नकळत होणारे बरे-वाईट संस्कार, गतानुगतिकाची साखळी, वेगवेगळ्या प्रदेशातील मित्रांची वेगवेगळी भाषा आणि बोलायची ढब, हे सगळे असे सुरेखपणे विणले आहे की प्रत्येक पदर हा भरजरी होऊन जातो. प्रत्येक फ्रेम सूचक तपशीलाने समृद्ध आहे, ते सगळे तपशील समजून घ्यायलाही दोनदा-तीनदा फिल्म बघावी लागते. ह्या फिल्ममधील सगळ्याच subtext विषयी अजून खूप लिहिता येईल, पण प्रत्येक पाहण्यात असे नवीन काही सापडण्यात जास्त मजा आहे. त्याला सगळ्याच खंद्या कलाकारांची सुरेख साथ मिळाली आहे. अर्थातच सर्वात प्रभावित करते ती नायिका – शेफाली शहाने साकारलेली मंजू. इतक्या प्रतिभावान कलाकाराला चित्रपटात अजूनही फारशी सशक्त भूमिका मिळाली नाही याची खंत वाटते.

Large Short Films आणि रॉयल स्टॅग ह्यांनी ही फिल्म व्यावसायिकपणे बनवली असल्यामुळे निर्मितीमूल्य चांगली आहेत. कॅमेरा, क्रू, संगीतात पैसे सढळहस्ते वापरल्याचे जाणवते. खाण्याचे पदार्थ, त्यांची तयारी (कणिक मळणे, कापाकापी, गॅसवरचा कुकर, सूचकपणे कढईला चिकटलेले चिकन लेग्ज्) हे तुकड्या-तुकड्याने चित्रित केलेल्या प्रसंगात, कित्येक टेकमध्ये केल्या जाणार्‍या शुटींगमधे सांभाळणे हे एक मोठे दिव्य असते; तो भाग त्यांनी लीलया हाताळलाय. अशा खात्या-पित्या घरातील किचनही अगदी पर्फेक्ट. त्यामुळे पदार्थांची रेलचेल, बाहेर पार्टीतला आस्वाद आणि आत किचनमधली धावपळ, हे अगदी नेमकेपणे, किमान फ्रेममध्ये आपल्यापर्यंत पोहोचते. त्या घरातले वातावरण, मंजू-ब्रिजेशचे नाते, त्यांच्या मित्र-मैत्रिणींचे स्वभाव, त्यांची एक संस्कृती, ह्या सगळ्याचे वर्णन करायचे तर पुस्तकाची पानेच्या पाने खर्च पडतील; पण हे सर्व तपशील सुरुवातीच्या थोड्याच प्रसंगात घायवान अचूकपणे रेखाटतो, तेही चित्रभाषेत – फार शाब्दिक फुलोरा न पसरवता. नीरज घायवानसारखा चित्रभाषा जाणणारा दिग्दर्शक चित्रपटाचा अनावश्यक ‘बोलपट’ होऊ देत नाही – चित्रपट माध्यमाची ताकद १५ मिनिटांच्या छोट्या शॉर्ट-फिल्ममध्येही दाखवतो.

किचनमध्ये स्वयंपाक चालूच आहे. उकाड्याने बायका हैराण झाल्यात, चहा घेतायत. मंजू गरोदर रजनीला कामवाल्या पर्बतियासाठी एक कप द्यायला सांगते, धड कप दिसत असतांनाही रजनी एक तुटका स्टीलचा छोटा ग्लास सरकवते. “उशीर झालाय, जाते आता” असे सांगून दुखावलेली पर्बतिया चहा टाळते. किचनमधे मंजूची धावपळ चालू आहे. भाजलेले वांगे सोलतांना हात पोळतोय, त्यांच्या गप्पा आता मुलांना सांभाळतांना करीअर राहून जाते इकडे वळल्यात. मंजू विचारतेय, मुलं झाली म्हणजे काम सोडलेच पाहिजे का? उकाडा, घामाने ती वैतागलीय, पण बाहेरून ज्युसची फर्माईश झालीयं. मुलं आता बाहेर दिवाणखाण्यात दंगा करतायत, मंजू त्यांना रागावून आत आणते आणि छोट्या डॉलीची आई, सरला तिला सगळ्या भैयांसाठी खाणे घेऊन जायला सांगते. शेफाली शहा एका अविर्भावात ‘अग, ह्या वयापासूनच हिला पण?’ हे निमिषार्धात दाखवते, शब्दांची गरजच नाही. बाहेर दिवाणखाण्यात वायफळ गप्पा चांगल्याच रंगात आल्यात. आता त्यात येणारा ट्रंप-हिलरीचा संदर्भही चपखल आहे.

सर्वसाधारणपणे शॉर्ट-फिल्मच्या शेवटी एक धक्का किंवा ट्विस्ट असतो, तसा धक्का ज्यूसमधेही येतो. शेवटी मंजू काहीतरी वेगळेच करते, म्हटले तर साधे पण अगदीच अनपेक्षित. सगळेच पुरूष अवघडून, अवाक होऊन बघत राहतात, आणि तिचा नवरा रागाने धुसफुसत राहतो आणि नंतर शरमिंदा होतो. मनिष चौधरीने ह्या प्रसंगात जान भरली आहे, आणि घायवानने त्या प्रसंगात परिसीमा गाठणार्‍या विरोधाभासाची ठसठस अचूक पकडलीयं. अर्थात, ह्या सगळ्यांवर कळस केलाय शेफाली शहाने – विध्द आणि कृध्द देहबोली आणि चेहर्‍यावरचे भाव असे पकडलेत की काय सांगावे? शेवटच्या अर्ध्या मिनिटात ती तिच्या अभिनयाने अक्षरशः नजरबंदी करते. तिच्या पाणी तरारलेल्या डोळ्यांतून जाणवणारी भेदक, जळजळीत नजर फिल्मचा पडदा भेदून कितीतरी वेळ जाळत रहाते.


Featured Image:  Snapshot from the short-film – Juice.