Mi…Ghalib – Promising despite its flaws!

Mi Ghalib

Mi Ghalib

Watched “Mi Ghalib” today – despite all its flaws, poor Urdu pronunciation and few redundant scenes, the overall effect is quite palatable. I especially liked that it tries to dig deeper into one of the most dominant instincts/motivations of living beings – to perpetuate beyond existence. That quest for fame and intricate struggle with ego. Some really intriguing questions and thankfully they don’t try to offer over simplified answers to essentially complex, existential questions.

And yes, music is really awesome. Though one may question if it is appropriate to use ‘Qawwali’ instead of ‘Ghazal’. But it does give that powerful musical soul to the play.

I really hope the team takes more efforts on the play, improve inconsistent & faulty Urdu pronunciation and discard few irrelevant scenes and punchlines that are totally uncalled for.

~ (FWIW) ….as a part of audience

तुती, कैर्‍या आणि संत्री

परवा अचानकच फळांच्या दुकानात दोन तुतीचे बॉक्स दिसले आणि मी एकदमच खुष झालो. मध्यंतरी महाबळेश्वरला खाल्ल्या होत्या, पण एकुणच नाजूक फळ आणि त्यामानाने नॉन-ग्लॅमरस, त्यामुळे स्ट्राबेरीसारखे सहजपणे मिळत नाही. त्या तुती अचानकच मिळाल्याने हरखूनच गेलो आणि उड्या मारतच लहानपणीच्या तुतीच्या झाडांवर पोहोचलो.

९-१० वर्षांचा होतो तेंव्हाची गोष्ट आहे…आम्ही रहायचो आणि त्यानंतर २-३ घरे सोडून उपाध्यांचा बंगला होता…मला वाटते ते तेंव्हा गाणे आणि violin शिकवायचे. त्यांची मुलगी (उज्ज्वला की उर्मिला ताई, आता नक्की नाव आठवत नाही) खूप छान गायची आणि त्यांच्या घराजवळून गेलो तरी ते सुरेल सूर ऐकू येत्…अर्थातच गाणे कळण्याचे ते वय नव्हते पण जे ऐकायचो ते छान वाटायचे. अर्थातच आमचे main attraction त्या घरामागे मोठ्ठे वाढलेले तुतीचे झाड होते. त्यांच्या घरामागच्या गॅरेजवर चढलो की मग आरामात तुती तोडून खाता यायच्या. पण एक अडचण होती…मला वाटते त्या गॅरेजचे छत पत्र्याचे होते आणि तिथे पालापाचोळाही खूप असायचा, त्यामुळे मग आवाजही बराच व्हायचा…आणि तसे ते लोकं एरवी सुरेल असले तरी रागावायचे आणि ओरडायचे बेसुरच! :P तरीही असा थोडाबहुत आरडाओरडा सहन करून मोठ्या प्रयत्नांनी त्या गॅरेजवर चढून आम्ही त्या तुतींवर ताव मारायचो…अचानकच दुकानात त्या तुती बघितल्यावर ती लहानपणीची झाडावरच्या तुतींची चव तोंडात आली.

मग तसेच ते ‘वेड्या आंब्याचे’ झाड आठवले. घरापासून जवळच मला वाटते अभ्यंकरांच्या बंगल्यात ते झाड होते. गम्मत म्हणजे ते झाड अगदीच लहान म्हणजे जेमतेम ४-५ फुटांचे असेल, पण नेहमी मोठ्ठाल्या कैर्‍यांनी लगडलेले असायचे…आम्ही चिल्ले-पिल्ले असलो तरी आमचा हात सहजच पोहोचायचा त्यामुळे आमचे त्या झाडावर विशेष प्रेम होते. त्या बागेला एक तारेचे कुंपण होते, पण तो काही फारसा प्रॉब्लेम नव्हता…खरा प्रॉब्लेम होता की ते घर बाकी बर्‍याच घरांच्या मध्येच असल्यामुळे काहीही करायला गेलो की लगेच सगळ्यांना दिसायचे…अर्थात आम्हीही मांजरांच्या पायांनी काम करायला शिकलो होतो. असेच एका दिवशी मी आणि माझा मित्र केदार आम्ही दोघांनी कैर्‍या तोडायच्या ठरवल्या – पण एक दुसरीच डोकेदुखी होती. केदारचा छोटा भाऊ कपिल हा जाऊन सारखी त्याच्या आईला चुगली करायचा…त्यात केदारची आई माझी टीचर, त्यामुळे ती भीती होतीच. कपिलला गुंगारा द्यायचा बराच प्रयत्न केला, पण तो सावलीसारखा आमच्या मागेच होता..शेवटी बरेच काऊन्सेलिंग करुन त्याला पटवला (काऊन्सेलिंगची खोडही तशी जुनीच!). त्यानेही आईला दादाने कैर्‍या तोडल्या हे सांगणार नाही अशी शपथ घेतली. तेंव्हा आम्ही शपथ वगैरे गोष्टी भयंकर सिरीयसली घ्यायचो…. त्यामुळे आम्ही जरा निर्धास्त झालो. मांजरीच्याच चपळाईने आणि दबल्या पावलांनी आम्ही आम्हाला हव्या तेवढ्या कैर्‍या तोडल्या आणि हळूच तारेच कुंपण ओलांडून आलो. मला वाटते तिथेच जवळच कुठेतरी बसून त्या कैर्‍या खाल्ल्या आणि मग मी, केदार आणि कपिल अगदी साळसूदपणे केदारच्या घरी गेलो. थोडी धाकधूक होतीच…पण काही मिनिटे शांततेत गेल्यावर आम्ही जरा रिलॅक्स झालो. तेवढ्यात कपिलला काय हुक्की आली काय माहीत, अगदी निरागसपणे ‘आई दादानी नै कैर्‍या तोडल्या काई, मनिष दादाने पण नै तोडल्या!’ असे बोलून आमच्याकडे बघू लागला. आता ह्याला हे तरी पचकायची काय गरज होती? पण झाले….त्यांची आई बोलुन-चालून आमची टीचर, तिने व्यवस्थित आमचा ‘क्लास’ घेतला. अर्थातच दुसर्‍या दिवशी आम्हीही सविस्तर कपिल बाळाचा क्लास घेतला. तो लहान असल्यामुळे अर्थातच त्याला जास्त ‘समजावून’ सांगायची गरज होती, त्यामुळे त्याच्याबरोबरचा आमचा ‘क्लास’ जरा लांबलाच….तो कार्टासुद्धा ‘अरे, पण मी दादांनी नाही तोडल्या’ असेच सांगितले ना आईला, असे म्हणत वाद घालत राहिला…असो! तो अजुनही कोणी काय ‘नाही केले’ हेच सांगत बसतो का ह्याची मला उगाचच कधीकधी काळजी वाटत राहते…

तशीच एक संत्र्याचीही फार जुनी आठवण आली. मला खरंतर अंधुकसेच आठवते आहे…मी चार-एक वर्षाचा असेल. आम्ही तेंव्हा विदर्भात अमरावती जवळच्या एका लहान गावात राहत होतो. बाबा बँकेत मॅनेजर होते आणि गावात बहुतेक लोकं त्यांना आणि पर्यायाने आम्हालाही ओळखायचे. माझ्याबरोबर खेळायला आणि मला सांभाळायला एक थोडा मोठा मुलगा यायचा….तो मला फिरायलाही घेऊन जायचा. एके दिवशी असेच आम्ही खूप लांबवर फिरायला गेलो आणि तिथे संत्र्याच्या बागा होत्या. मला वाटते त्याने मला विचारले की संत्री हवीत का? मी कशाला नाही म्हणतोय? तसेही आपले-दुसर्‍याचे कळायचे नाही मला त्या वयात. शिवाय फळे म्हणजे जीव-की-प्राण…त्यातुन झाडावरची संत्री मिळतात म्हटल्यावर मी एकदम खुषीत. आम्ही बरीच संत्री खाल्ली आणि जवळजवळ एक पिशवी भरून घरी घेऊन आलो….संध्याकाळी तो बागवाला शेतकरी आला बाबांकडे तक्रार घेऊन…तुमच्या मुलानी खूप संत्री तोडली म्हणून. बाबांनी बहुतेक त्याला संत्र्यांचे पैसे दिले असावेत, त्यांनी मला मारल्याचे काही मला आठवत नाही. आई-बाबा रागावले ओरडले असतील बहुतेक….पण तेही काही आठवत नाही. आठवणी खरच कुठून कुठे घेऊन जातात…तुतीपासून संत्र्यांपर्यंत, शेकडो मैल दूर असलेल्या एका गावातून दुसर्‍या गावात एका निमिषार्धात ….मग ह्या संत्र्यांच्या आठवणींबरोबरच त्या गावातल्या आणखी कितीतरी आठवणी आल्या…माझे वय तेंव्हा ३-४ किंवा फार-फार तर ५ वर्षे असेल. आणि ह्या सगळ्या माझ्याच आठवणी आहेत…आई-वडिलांनी सांगितलेल्या नाहीत. असो! त्या गावाचे किस्से पुन्हा कधीतरी….

सध्या एका उपनगरातल्या छोट्या प्लॅटमधे राहतो…हपापलेल्या बिल्डर्सनी पोसलेल्या ह्या सिमेंट्च्या जंगलात फळांची झाडे फारशी दिसतही नाही. माझ्या पिल्लाकडे अशा झाडांच्या, फळांच्या रसदार आठवणी असतील का हा प्रश्न अधून-मधून सतावत राहतो. महाबळेश्वरला स्ट्रॉबेरी महोत्सवात त्या झुडुपांतुन स्ट्रॉबेरी तोडतांना फुललेला त्याचा चेहरा कधी विसरता येणार नाही. पण परवाच एक गंमत झाली. आमच्या ह्या प्लॅटस पासून जवळच काही बंगल्यांची सोसायटी आहे, मिश्तू हिच्याबरोबर तिथे फिरायला गेला होता आणि हा तिथल्याच एका बंगल्यातील कैरीच्या झाडाकडे भान हरपून पाहत होता…त्या बंगल्यातल्या आज्जी भलत्याच प्रेमळ निघाल्या, त्यांनी ह्या दोघांनाही घरात बोलावले आणि आमच्या पिल्लाने गच्चीवरून मनसोक्त कैर्‍या तोडल्या. निदान ३-४ किलो तरी कैर्‍या घरी घेऊन आला….आणि त्याचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा हाऽऽऽऽऽ असा फुललेला! आणि अर्थातच त्याला बघून आमचाही!

फार काळजी करायची कारण नाही, झाडांवर प्रेम करणार्‍या माणसांना प्रेम करणारी झाडे मिळतातच की! :-)